माझ्या मामाच्या गावी आणि काकांच्या गावी घरात एक अडगळीची खोली होती. अंधारी खोली म्हणून तीचा अनेकवेळा घरातल्या सदस्यांकडून उल्लेख केला जात असे. आम्ही भावंडं सुट्टीत एकत्र जमलो की या खोलीतून बऱ्याच ठेवणीतल्या गोष्टी बाहेर येत. अगदी वाळवणाच्या(पापड, कुरडया) लोणची,मेथांबा, साखरांबा मोरावळा या पदार्थांपासून मोठ्या पितळी पातेल्यात पर्यंत आणि जास्तीच्या अंथरूण पांघरूणा पर्यंत अगदी बरचसं सामान या अंधाऱ्या खोलीत ठेवलेले असे ते आम्हा मुलानातवंडांच्या मदतीने आई, आज्जी, मावशी हे काढून घेत असत. हे सगळं बाहेर आलं की आपला इथला मुक्काम महिनाभर तरी आहे याची खात्री पटायची मग काय नुसता दंगा. हाच दंगा आवरेनासा झाला की याच अंधाऱ्या खोलीत कोंडायची धमकी वजा दम भरला जाई. त्या वेळी याच अंधाऱ्या खोलीची भिती वाटायची. कालांतराने ही अंधारी खोली म्हणजे अडगळीचे आणि सामान ठेवण्यासाठी असावी असे वाटू लागले. मोठं होईपर्यंत या खोली बद्दल उत्सुकता मात्र कायम राहिली. वयाप्रमाणे भिती कमी होत गेली पण उत्सुकता वाढतच गेली.
तर अशी ही अंधारी खोली कायमच थंड असायची म्हणूनच इथे वर्षभर टिकतील असे पदार्थ साठवले जायचे. वर्षभराच्या धान्याची कोठारे, उन्हाळी पदार्थ, काचेच्या बरणीत भरून ठेवले जाणारे पदार्थ जसे लोणचं वैगरे हे सगळं या खोलीत असायचं. या शिवाय जपून ठेवण्याची प्रत्येक गोष्ट, वस्तू सुद्धा इथेच असायची. बराच मौल्यवान खजिना तिथे असे. म्हणूनच आज्जीची बारीक नजर या खोलीवर असायची. आम्हा मुलांसकट कोणालाही त्या खोलीत तिच्या परवानगी शिवाय जाता येत नसे. तसेच ठोस कारण दिले तरी ती बरोबर असणारच. तिची नजर चुकवून आम्ही त्या अंधारात धडपडत जाऊन वाळवलेले जिन्नस, लोणच्यातील कैऱ्या पळवायचो पण एकटं खोलीत जाण्याची हिंमत कधीच झाली नाही. विलक्षण गूढ भीती आणि प्रचंड उत्सुकता अशा संमिश्र भावना त्या खोली विषयी कायमच राहील्या. एकही खिडकी नसल्याने अंधार आणि म्हणून कायमच थंड अशी ती खोली आम्हा मुलांचा चर्चेचा विषय असायची. रात्रीच्या भूतकथांची सुरवातच मुळी अडगळीच्या खोलीत येणाऱ्या आवाजांपासून व्हायची. त्या आवाजांची सत्यता पडताळून पाहण्याची हिंमत नव्हती. वस्तू काढताना खोलीतला दिवा लावला जाई, त्यावेळी पाहिलेली ती खोली, तशी साधारण दहा बाय दहाची थोडीफार लहान खोली होती. एक लाकडी बाज एका भिंतीला लागून ठेवलेला, त्यावर आज्जीच्या नऊवारी साडी च्या शिवलेल्या आठ-दहा गोधड्या, दोनतीन रग, उशा आणि एक दोन पलंगपोस, दुसऱ्या बाजूला धान्याच्या कोठ्या, त्यावर कडधान्यांचे पत्र्याचे डबे, एका कोनाड्यात देवघरातील सणावारी लागणारी सामग्री. हे आणि बरच काही समान तिथे असताना त्या खोलीला अडगळीची खोली का म्हणलं जायचं हे कोडं मला अजुन उमगलेले नाही. मोठं झाल्यावर या खोलीचं महत्त्व समजत गेलं आज्जीच्या राखण करण्यामागचं कारण उलगडत गेले. या खोलीतून घेतलेली प्रत्येक लहानमोठी गोष्ट कटाक्षाने पुन्हा जागेवर ठेवण्याचा तिचा हट्टच असायचा. काम झाल्यावर ती वस्तू परत तिच्या ताब्यात मिळेपर्यंत ती त्रागा करायची. त्या वेळी ते समजत नव्हते पण त्यामुळे वस्तू प्रत्येक वेळी जागेवर सापडते आणि फजिती टळते हे आता कळतंय. या अडगळीच्या खोलीच्य संकल्पनेतून आताच्या कोठी घराचा जन्म झाला असावा हे नक्की. आजकाल बंगल्यात तर असतेच पण फ्लॅट मध्ये सुद्धा स्वयंपाकघराच्या बाजूला आवर्जून कोठी घर (गोडाऊन) बनवले जाते. अर्थात भरपूर प्रकाश आणि साचेबद्ध रचना यामुळे त्याला अंधाऱ्या खोलीची गंमत नाही. अगदी शक्य नसेल तर माळा, पोटमाळा तरी असतोच. एकूण काय संसारात खूप काय काय लागतं आणि ते ठेवायला जागा हवी असते. या अंधाऱ्या खोलीची अजून एक गंमत आहे बरका, आम्हा मुलांच कोणालाही न उमगलेलं एक सिक्रेट, तर आम्ही मुलं मस्ती करून दमायचो आणि ही मोठी मंडळी सतत कामं सांगायची. उन्हात सतत बाहेर खेळणं ही अशक्य असे. मग काय दुपारी मोठी माणसं जरा झोपली की आम्ही मुलं या अंधाऱ्या खोलीत जाऊन बसायचो. कोणाला न कळेल असं मग आवाज न करता गप्पा मारत बैठे खेळ खेळायचो हळूहळू अंधाराचा डोळ्यांना सराव होतो मग काय आमचंच राज्य. मोठ्यांना कळेल असे कोणतेही उद्योग करायचे नाहीत हा अलिखित नियम.
कधी कधी रागे भरलेल्या आई किंवा वडलांचा खूप राग यायचा मग पुण्यातील घरी माळ्यावर किंवा मामाच्या घरी असलो तर अडगळीच्या खोलीत एकटं जाऊन तासंतास बसायचो. मग कोणीतरी खाऊ देऊन समजूत काढायचं. झालं गेलं विसरून पुन्हा नव्याने मस्ती सुरू व्हायची.
किती सहज सोपे होते आयुष्य नाही का?? आजकाल पेपरमध्ये आठवी, नववी मधली मुलं निराशेच्या गर्तेत जातात आणि आत्महत्ये सारखा टोकाचा विचार करतात. काय कारणं असतील अशी की जी त्यांना सांगता येत नाहीत की ऐकणारं कोणी नाही? घटना घडल्यानंतर उरतात ते फक्त प्रश्न आणि प्रश्न. दोष या compact कुटुंबपद्धतीचा आहे असं मला वाटत. सगळेच बिझी असतात कोण कोणाशी आणि कधी बोलणार?? राग, दुःख, फ्रस्ट्रेशन आणि अगदी आनंदही वाटायला आणि वाटून घ्यायला कोणी नाही. समवयस्क मित्रमंडळी, भावंडं , शेजारीपाजारी, नातेवाईक ही मंडळी आपण स्वतःहून आपल्या आयुष्यातून केंव्हाच हद्दपार केली आहेत. एकच मूल त्यामुळे भावंडं नाही आणि असेलच तर सो कॉल्ड प्रायव्हसी जपणे हा मोठा मुद्दा झाला आहे. त्यामुळे कोणी आयुष्यात डोकावलेच तर मेनर्स नाही म्हणून टाळले जाते. अशी अडगळीची खोली सुद्धा नाही जिथे मन शांत करता येईल आणि समजूत काढायला कोणीतरी येईल अशी अपेक्षा सुद्धा नाही. आपण आपल्याच भोवती एकटेपणाची भींत उभी केली आहे आणि तिचीच अडचण होते आहे, ही कोंडी फुटली पाहिजे त्या करता पुन्हा एकदा अंधाऱ्या खोलीतलं सामान बाहेर निघायला हवं. वर्षातून एकदा तरी घरातली आणि मनातली अडगळीची खोली मोकळी करायला हवी याची सुरुवात पालकांनीच करणं गरजेचं आहे.
बघा पटतय का???
सौ.मंजिरी जानोरकर

