लोणकढं तूप म्हणजे काय ग आई? असं लहान मुलांनी विचारणं हे समजू शकतो पण मोठ्या मुलीने किंवा एखाद्या मोठ्या स्त्री ने हा प्रश्न विचारवा हे न पटणारे आहे. दुर्दैवाने आज मुलामुलींना घरचं तूप कसं बनवतात हे माहीत नसते हे मात्र खरं आहे. आधी लहान म्हणून आणि नंतर कॉलेज मग वेगवेगळ्या परीक्षा आणि महत्वाचे म्हणजे करियर, यामुळे घरातील साधी साधी कामं करायला जिथं वेळ नाही तिथे लोणी आणि तूप करणं अशक्यच असणार, त्यातही कमी म्हणून डाएट प्लॅन्स आणि तूपा बद्दलचे गैरसमज, मग काय सणासुदीच्या दिवसात घरगुती तूप विकत आणून वेळ भागवली जाते. सर्रास मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात हेच चित्र आहे अर्थात अपवाद वगळून.
असो तर बरेजणांना माहीत नसलेलं आणि आमच्या पिढीने लहानपणापासून घरात बनवताना बघीतलेलं लोणकढं तूप आणि गरमागरम वरणभात म्हणजे स्वर्ग. बाळाला दात येताना बाळाचं उष्टावण करण्याची पध्दत आहे. उष्टावण म्हणजे आईच्या दुधा सोबत वरचं अन्न सुरू करण्याचा सोहळा. मामाच्या मांडीत बाळाला (मुलगा -मलगी) बसवून चांदीच्या ताटात मऊ मऊ वरणभात साजूक तूप घालून चांदीच्या चमच्याने पहिला घास मामाच्या हाताने भरविला जातो. इथून साजूक तूपाशी बाळाचा संबंध सुरू होतो तो पुढे जाऊन कायमचाच. तूपभाताबरोबरच दात आल्यावर तूपसाखर पोळी खाल्ली नाही असं कोणी सापडणार नाही. गरम गरम पुरणपोळी तूपा शिवाय अपूर्ण आहे. उकडीचे मोदक तूप न घालताच खाणं ही कल्पना सुद्धा करवत नाही. असं हे लोणकढं तूप औषधी आहे. आयुर्वेदातील अनेक औषधे ही आवर्जून तूपासोबत घेण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. आजकाल गाईचं दुध बऱ्याच ठिकाणी घेतले जाते. दुध कोणतंही असो तूप बनवायची पद्धत एकच आहे. दुध मंद गॅसवर चांगले दोनवेळा खरपूस तापवून घेतलं की मग न हालवता गार करायला ठेवलं की दाट साय येते ती साय हलकेच वरच्या वर काढून घ्यायची त्याबरोबर पडेल तेवढंच दुध पडू द्यायचं. (आमच्याकडे ह्या करता खास पद्धतीच्या चिनी मातीच्या झाकणाच्या दोन जोडीच्या बरण्या होत्या, अजून आहेत आईकडे. मी मात्र ठराविक भांडी ठरवून ठेवली आहेत तीच वापरते कारण दुधा-दह्याची भांडी शक्यतो वेगळीच ठेवावीत म्हणजे नासत नाही. ) या काढून ठेवलेल्या सायी मध्ये लगेचच चमचाभर दही घालून व्यवस्थित हलवून विरजण लावून ठेवावे दोन-तीन दिवस रोज येणारी साय टाकून बरणी हलवून ठेवावी चमच्याने ढवळू नये कारण त्यामुळे वास लागु शकतो. विरजण लागल्यावर फ्रिजमध्ये ठेवून चालते. ज्या दिवशी ताक करायचे असेल त्या दिवशी फ्रिज मधून काढून नॉर्मल तापमान झाल्यावर रवीने किंवा hand mixer ने लोणी वर येईपर्यंत घुसळून घ्यावे घुसळताना मधेमधे थोडं थोडं पाणी घालत राहावं म्हणजे लोणी वर यायला लागते. हे वर आलेलं लोणी वरच्या वर जाड बुडाच्या भांड्यात काढून गॅस वर ठेवून द्यावे. यालाच लोणी कढवणे असं म्हणतात. हे लोणी उकळायला लागले की मधूनमधून पळीने ढवळावे. बुडाला तांबूस व्हायला लागले की गॅस बंद करायचा बदलेला रंग डोळ्याला जाणवतो. हे कढण गरम असतानाच त्यावर झाकण ठेवायचं बरेचजण त्यात विड्याचे पान टाकतात त्यांचा खमंग वास लागतो अर्थात हे आवडतं असेल तर नाही टाकलं तरी चालते.
लोणी काढल्यावर खाली उरतं ते ताक, उन्हाळ्यात हे ताक काळे मीठ आणि जिरं घालून प्यायला फारच छान लागते. एरवी विकत आणून निवळीचे पातळ, पाणचट पांढरं थंडगार पाणी ताक म्हणून आवडीने सगळेजण पितात. त्यापेक्षा घरी केलेलं हे रुचकर ताक हेल्दी तर आहेच शिवाय घरचं लोणी, तूप आणि बेरीचा (तूप कढवताना खाली राहाते ती) घरात दरवळणारा वास घराला घरपण आणि पोषण दोन्ही देईल हे निश्चित.
सौ.मंजिरी जानोरकर.

