अस्तित्वाच्या खुणा

      मित्र आणि मैत्रिणींनो, 

   मी सौ मंजिरी जानोरकर एक सर्व सामान्य गृहिणी. Graduation पूर्ण झाले आणि सुस्थळी विवाह करून टिपीकल गृहिणी झाले, यात विशेष असे खरंच काही नाही पण लिखाणाची आवड होती आणि मनातले विचार लिहीत होते. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्याच शाळेत पालक-शिक्षक संघाचे काम काही दिवस केले. शिक्षिका होण्याची उर्मी होतीच त्यामुळे असेल कदाचित  शिक्षकांच्या समस्या समजून घेता आल्या आणि त्या मांडता (लिहीता) आल्या नोव्हेंबर १९ मध्ये ब्लॉग सुरु केला. त्या आधी काही मासिकं, शालेय वृत्तपत्र, वर्तमानपत्र यातुन लिखाण पाठवत होते. बरेचदा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत होता. तरीही आपलं हक्काचं  काहीतरी हवं जिथं मनसोक्त लिहीता येईल त्यातूनच ही नवी संकल्पना समोर आली खरी पण कोणी वाचेल का? आपल्या ब्लॉगला भेट देईल का? अशी भीतीही होती. त्यामुळे ब्लॉग लिहायला सुरुवात जरा उशीराच केली. मुलांचं संगोपन करताना करिअर मागं पडलं, कुटुंबाला प्राधान्य दिले. मुलं स्वावलंबी होत गेली आणि मी मोकळी मग काही प्रसंगी मनात रिकामपणाची भावना यायची. त्यातूनच लिहायला प्रोत्साहन मिळत गेले, “मनाचिये घावावरी मनाची फुंकर.” माझ्या घरात असण्याने कुटुंबातील वातावरण चांगले राहीले, मुलांना वेळ देता आला,नवरा त्यांच्या व्यवसायात लक्ष देऊ शकला, प्रसंगी मी होतेच. माझं महत्व मला माझ्या चौकोनी कुटुंबानं पटवून दिले. म्हणूनच माझ्या सारख्याच करियर त्यागून पूर्ण वेळ होम मेकर होणाऱ्या सगळ्याच जणींच्या मनात येणारे विचार मी लिहीण्याचा प्रयत्न करते. त्यांच्याही मनात येऊ शकणारा न्युनगंड कमी करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी आणि महत्व ओळखण्यासाठी मी लिहीते. कधी वैचारिक, आध्यात्मिक तर कधी आठवणीं असा लेखन प्रपंच चालू आहे. अपेक्षा आहे ती वाचकांची आणि प्रतिसादाची ती मिळेल याची खात्री बाळगून माझ्या ब्लॉग ला भेट देण्याची विनंती करते 

नमस्कार.