आय लव्ह माय इंडिया

“माझं माझ्या देशावर प्रेम आहे. ” सुजलाम सुफलाम … असा आपला भारत देश. दुसऱ्या देशात राहून आलेल्या माणसाला आपला देश सुंदर वाटतोच पण आपल्या देशात राहणारा माणूस देशावर खरं प्रेम करतो का?? हे प्रेम करण्याइतका वेळ त्याच्याकडे आहे का?? असा प्रश्न विरेन ला पडला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा मित्र अमेरिकेहून स्वदेशी परतला होता. त्याला भेटल्या पासून विरेन जास्त अस्वस्थ झाला होता. अमेरिका काय आणि इंग्लंड किंवा कॅनडा काय, सगळीकडेच शिक्षण आणि नोकरी करता गेलेली मुलं आता भारतात परतू लागली आहेत. सतत बदलणारी परराष्ट्रीय धोरणं आणि नियम यामुळे तिकडे सेटल होणं आता अवघड आणि जवळपास अशक्य होऊन बसले आहे. व्हिसा वाढवण्यासाठी पूर्वी तिथल्या कंपनी स्पोन्सर करायच्या त्या बाबतीत सुद्धा बरेच नियम बदलले गेले म्हणून बरीच मंडळी परत फिरू लागली आहेत हे वास्तव विरेनला त्याचा मित्र सारंग मुळे समजले. तोच म्हणाला की, “बरेचदा खरं सांगायचं सोडून ही परतणारी मंडळी देशप्रेम म्हणून आलो हे सांगताना बिचकत नाहीत पण तिकडून आल्यावर इकडे मात्र इथल्या सारखे वागतात. तिथली शिस्त, स्वच्छता याचं गुणगान करतील पण बाटली मधलं पाणी पिऊन प्लास्टिकची बाटली रस्त्यावर फेकतील अर्थातच अपवाद आहेत पण कमी. ” इथे चालतं रे सगळं. ” वर ही मल्लिनाथी करतील. मला असे लोक आवडत नाहीत. यांच्या मुळे माझ्यासारखे जे खरंच फक्त शिक्षणाकरता गेलो आणि परतलो ते सुद्धा बदनाम होतात.” निराश झालेला सारंग मान खाली घालून बसला. त्याला तसं बसलेलं बघून विरेन म्हणाला, ” सारंग इथे रोजचा दिवस एका नव्या आंदोलनाने होतो. रोज भाषावाद, प्रांतवाद यावरून मारामाऱ्या होत असतात. जाती, धर्म, पंथ अगदीच कमी म्हणून की काय गल्ली बोळात सुद्धा हद्दीवरून भांडण जुंपतात आणि खून पडतात. पोलिस, कायदा यांचा धाक नाही. कोणीही मुलींची छेड काढतात आणि काही कारवाई होत नाही. कोर्टात जलदगतीने लागणारे निकाल कमीतकमी दहा ते पंधरा वर्षांनी लागतात काही प्रकरणात तर बॉम्ब स्फोटातील दोषी सुद्धा पुराव्याअभावी निर्दोष सुटले जातात. तरीही आमचं आमच्या देशावर प्रेम आहे आणि या सगळ्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही ही खरी गंमत आहे.” आता विरेन मान खाली घालून बसला होता. “थोडावेळ थांबून विरेन म्हणाला सारंग आम्ही इथे राहून सुद्धा केवळ सवर्णीय म्हणून आम्हाला नोकरी मिळत नाही. शैक्षणिक आरक्षण आणि नोकरी मधील आरक्षण कमी म्हणून लाडकी बहिण, मोफत धान्य, प्रेमाचा शिधा अन् बरंच काही अशा योजना येतच असतात आणि मध्यम वर्ग जो या कशातच बसत नाही तो उपशी आणि बेरोजगार. तू सांग तरीही आमचं देशावर प्रेम. हो ते आहेच कारण आम्ही आमच्या संस्कृती वर प्रेम करतो पण राजकारणात संस्कृती सोडून जात, धर्म, भाषा यावरून तरुणांना भडकवले जाते. सगळे पक्ष आपली व्होट बँक सुरक्षित करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. परप्रांतीय म्हणजे काय हे सुध्दा नसमजणाऱ्या वयातली मुलं शाळेत सुरा,चाकू उगारतात. इतर देशांत सुद्धा फार काही बरी परिस्थिती नसेलही कदाचित पण निदान काम करून दोन वेळा जेवण करून शांत जगता तर येईल असं वाटतं आणि म्हणून जो देशात आहे तो बाहेर जायला तयार असतो.”

खूप वेळापासून ही चर्चा ऐकणारे कुणीतरी एक काका बाजूला बसले होते ते उठून या मुलांच्या जवळ आले आणि म्हणाले, ” Sorry to interrupt you पण मी केंव्हा पासून तुमचा निराशाजनक सूर ऐकतो आहे आणि आता राहावे ना म्हणून आलो. कसं आहे ना मुलांनो मी एक रिटायर्ड शिक्षक आहे त्यामुळे सतत शिकवत राहाणं ही माझी वृत्ती आहे. बराचवेळ तुम्ही देशातील फक्त आणि फक्त नकारात्मक गोष्टींबद्दल बोलत आहात पण दुसऱ्या बाजूने विचार करता का जरा, पहा बरं इतर देशांत लोक स्वावलंबी आहेत तिकडे नोकरचाकर नाहीत. घरातील प्रत्येक काम स्वतः करावं लागतं तसं तुम्ही इकडे वागा काय हरकत आहे. तिकडे वेटर, हेल्पर यांना रिस्पेक्ट आहे त्यामुळे तिथे कामाची लाज वाटत नाही. मजूर किंवा कामवाली न म्हणता हेल्पर हे जास्त रिस्पेक्टफुल आहे. शेतीसाठी , भिक्षूकी करण्यासाठी , खेड्यातील शाळेत शिक्षक मिळत नाहीत. इतकेच काय तर घड्याळ, मोबाईल, मिक्सर, फ्रिज हे दुरूस्ती करण्यासाठी तंत्रज्ञ tecnician मिळत नाहीत हे शिका. प्लंबर,सुतार यांची उणीव घरघरात जाणवते online सर्व्हिस सुरू करा. पण लहान कामं आणि थोडाथोडा मिळत राहणाऱ्या पैशापेक्षा मोठ्या पगाराची नोकरी शोधण्यात धन्यता मानत बसायचं आणि देशाला नावं ठेवायची हे अयोग्य आहे. तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत पण ठराविक साचा हवाय हा खरा प्रश्न आहे. इतर देशात जाण्यापेक्षा आपल्या देशात सगळ्या प्रकारच्या कामाला मान मिळवून देणे ही तुमच्या सारख्या तरुणांची प्रायोरिटी असली पाहिजे. सरकार, कायदे हे आपलं कर्तव्य पार पाडतीलच त्याचा विचार करून उपयोग नाही. त्या पेक्षा आपण समाजाला शक्य तेवढे चांगले देण्याचा प्रयत्न करायला हवा.” “बाकी थोड्याफार फरकाने आमच्या काळात सुद्धा अशीच परिस्थिती होती. काही गोष्टी चांगल्या होत्या तर काही वाईट सुद्धा होत्या. हे चालूच राहणार. परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा मार्ग काढावा ही खरी आपली संस्कृती आहे. ती जगण्यावागण्यात उतरली तर आपण खऱ्या अर्थाने देशप्रेमी आहोत हे लक्षात येईल.” इतकं बोलून काका निघूनही गेले मुलं त्यांच्या पाठमोऱ्या आकृती कडे बराच वेळ बघत राहीली आणि एका देशप्रेमी शिक्षकाने दिलेला उपदेश आचरणात आणण्याचा विचार करायला लागली.