आई नेहमी सांगायची शिकून मोठे व्हा पण मन सुद्धा मोठं करा, त्या वेळेस म्हणजे काय ते कळत नव्हते. हळूहळू जसजशी वयाने वाढत गेले तसं तसं मन मोठ्ठं करणं म्हणजे काय ते समजायला लागले अजूनही तितकं जमलेलं नाही कारण ते तितकं सोपं नाही. आज मागे वळून बघताना त्या वेळची आई आठवते आणि आईला हे किती सहजपणे जमलं होतं याचं आश्चर्य वाटते.
आपल्या आसपासच्या लोकांना माफ करणं, त्यांच्या गुणांचे कौतुक करणं अगदी आपल्या गुणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या, द्वेष करणाऱ्या लोकांचही कौतुक करायला मन मोठं असावं लागतं. कुटुंब सांभाळताना अनेक गोष्टींत घरातील प्रत्येक स्त्रीला मन मोठं ठेवावं लागतं. आपल्या मुलांचं, नवऱ्याचं कौतुक कोणतीही आई, पत्नी करेलच पण तीची दखल मात्र कोणी घेत नाही, हे सहन करायला मन मोठं लागते. आज आपल्या समाजात एकमेकांचे कौतुक करण्यास प्रत्येक जण कमीपणाचे मानतो,”मी का त्याला अथवा तीला महत्व देऊ, का कौतुक करू? ” अशी मनोवृत्ती सर्रासपणे दिसते. पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हात आणि मन मोठं लागतं. मोबाईलवर ईमोजी टाकून हात झटकून टाकतात पण मनातून मात्र प्रत्येक जण आपल्या माणसांच्या येण्याची कमीतकमी फोन ची वाट पाहत असतो. कोणतेही यश असेल किंवा प्रशंसनीय कृती कौतुकाला पात्र असते आणि जो तो आपल्या माणसांकडून कौतुक होण्याची अपेक्षा करतो. हे स्वाभाविक आहे पण हाच प्रत्येक जण स्वतः इतरांची प्रशंसा करताना हात आखडता घेतो हा विरोधाभास आहे. मन मोकळं ठेऊन, द्यावं आणि घ्यावं सुद्धा, दोन्ही जमलं पाहिजे. आपण केलेल्या, मिळवलेल्या गोष्टी उत्साहानं दाखवत असताना इतरांना सुद्धा काही दाखवायला आवडत असेल आणि तो/ती सुद्धा तुमच्या कडून शाबासकीची अपेक्षा करत असेल याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे.
आपल्या मुलांच्या यशोगाथा, लग्न कार्य इत्यादी गोष्टींचे अल्बम, नवं घर आणि इतरही लहान सहान गोष्टी अभिमानाने दाखवणारे पालक दुसऱ्यांनी दाखवलेल्या त्याच गोष्टी तेवढ्याच उत्साहाने खरंच बघतात का? तेवढी आपुलकी नात्यात उरली आहे का? प्रेम ओढ तेव्हांच राहील जेंव्हा ही देवाणघेवाण होईल. करावं आणि करून घ्यावं.
मन मोठं असलं म्हणजे हे सगळं जमतं आणि प्रेम टिकतं.
सौ.मंजिरी जानोरकर.

