आजकाल या आंदोलनांचे पेव फुटले आहे, असं म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जो तो हे आंदोलनाचं हत्यार उचलत आहे. शेतकरी, कर्मचारी आणि आता विद्यार्थी! काय गंमत आहे नाही, आंदोलन कधी, कोणी आणि कशासाठी करावं हे इतिहासात शिकण्याच्या काळात आंदोलन करण्या इतपत ही पिढी प्रगल्भ झाली?
महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी परकियांच्या विरोधात हे हत्यार उपसले होते आणि ते सुद्धा अहिंसेच्या पद्धतीने. सध्या मात्र अहिंसा पूर्णपणे बासनात गुंडाळून ठेवलेली दिसते. उठसुठ आंदोलन करण्याची चक्क फॅशन आली आहे. कोणाही समुदायाला लक्ष वेधून घेण्यासाठी हा नवा मार्ग (राजमार्ग). मिळाला आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तरी प्रसिद्धी आणि दुर्लक्ष केले तरी माध्यमातून प्रसिद्धी, एकूणच विन विन सिच्युएशन. यश मिळो ना मिळो प्रसिद्धी नक्की.
सरकारला कोंडीत पकडण्याची गुरूकिल्लीच जणू ह्या नव्या पिढीला मिळाली आहे. गर्दीला दिशा आणि विचार शक्ती दोन्ही नसते . त्यातून लहान वयात चिथावणी मिळाली तर बघायलाच नको.
समाज प्रबोधन, सामाजिक मानसिकता, सामाजिक भान हे सगळं हरपले आहे. जो सकारात्मक विचार पूर्वी आंदोलन करताना दिसायचा तो दिसतं नाही, त्याहीपेक्षा दाखवणारा कोणी नाही, हेच दुर्दैवाने म्हणावे असे वाटते. आंदोलन करणं चुकीचं नसलं तरी उद्दिष्ट महत्वाचे आहे. ते करण्याचा हेतू, कारणं स्पष्ट असावी ही मूळ बाबच लक्षात घेतली जात नाही. हे सगळं ठरवणारे आंदोलनांचे नेते किंवा आंदोलनकार दिशाहीन झाल्यासारखे वाटतात. वैचारिक बैठक, आढावा बैठक हे शब्द सुद्धा कदाचित त्यांना माहीत नसतील.
आंदोलनं जरूर करा पण समाजात चांगले परिणाम दिसून यावेत, सर्वांना न्याय मिळावा अशा आणि इतर अनेक चांगल्या गोष्टीं करता ते केलं तर त्याचंही महत्व टिकून राहील अन्यथा, “कोणीही यावे टपली मारून जावे” अशी गत होईल. त्याची धार कमी होईल, याचे भान आंदोलन करणाऱ्यांनी ठेवलंच पाहिजे. खूप गरज निर्माण झाली असेल, अगदी नाईलाज असेल अशा वेळी हा शेवटचा हुकमी पर्याय असला पाहिजे. मुख्य म्हणजे कारणही तितकच मोठ्ठं असावं. लहान सहान कारणांवरून आंदोलन करून खेळ मांडण्यात काय हाशील??
रोजचं नवीन नवीन कारणांवरून आंदोलनं होतात आणि सुर्यास्त झाला की संपतात, दुसऱ्या दिवशी,” नवा दिवस नवं आंदोलन.” ही परिस्थिती बदलायला हवी. कार्यकर्ते, नेते मंडळी, शिक्षक, सरकारी अधिकारी यांच्या बरोबरीने समाजातील प्रत्येक सदस्याची ही जबाबदारी आहे. लोकशाही आहे आणि त्यात काही अधिकार सुद्धा आहेत हे मान्य पण योग्य वेळी ते अधिकार वापरणं हा आदर्श लोकशाहीचा मापदंड आहे. तो समजणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढीला फक्त अधिकार सांगायचेच नाहीत तर ते कुठे, कधी, कसे वापरावे हे शिकवण्याची जबाबदारी घेणारा खऱ्या अर्थाने सुजाण नागरिक म्हणता येईल. पटलं तर नक्की लोकांपर्यंत पोहचवा.
सौ.मंजिरी जानोरकर.

