आठवणी मनातल्या

   पुण्यातल्या पर्वतीच्या जवळच्या चाळीत माझे लहानपण  गेले. चाळीत आठ घरं लागून आणि एकमेकांत मिसळून असायची. सगळी मुलंमुली साधारण समवयस्क. बायकाही सगळ्या बरोबरीच्या आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक स्थिती सुद्धा एक सारखीच त्यामुळे कमीजास्त,लहानमोठे, गरीब-श्रीमंत असले भेदभाव नव्हते. घरं देखील अगदी मोजक्या दोन खोल्या आणि स्वतंत्र टॉयलेट बाथरुम, ही चैन होती त्या काळात. हवं तेंव्हा चाळीत कोणाकडेही आम्ही खेळत असू. दुपारनंतर संध्याकाळ होण्याआधी थोडावेळ बायका एकमेकींकडे गप्पा मारायला जाऊन बसत असत. मग आमची वरात सोबत असायचीच. काहीतरी काम काढून आई शेजारी पाजारी थोड्या वेळ जायची, काम छोटंसं असायचं पण मग त्या काकू ही,”बसा हो वहीनी” असं म्हणणारच आणि आई सुद्धा नाही नाही म्हणत अर्धा तास बसणार हे आम्हा मुलांना माहीत झालं होतं. घरी जाताना मांडणीत ठेवलेली कोयरी आणून एकमेकींना हळदी-कुंकू लावलं जायचं आणि चिमुटभर साखर हातावर दिली जायची. गंमत म्हणजे आम्ही मुलं त्या चिमुटभर साखरे करता आईच्या कंटाळवाण्या गप्पा संपेपर्यंत थांबायचो. समजा आई आधी गेलेली असेल तर तीला बोलवायला म्हणून आम्ही जायचो आणि आईच्या हाताला लोंबकळत,”चल ना घरी” करून आईला छळत असू. अर्थात त्या वयात आईला मिळणारा तेवढाच मोकळेपणा आम्हाला कळत नव्हता. आमच्या अगदी शेजारी राहणाऱ्या काकूंकडे शिलाई मशीन होते आणि त्या वेळी आई बऱ्यापैकी कपडे स्वतः शिवत असे मग काय दुपारच्या वेळी सगळं आवरून आई शिवण घेऊन त्यांच्या कडे जायची, सुट्टीच्या दिवशी मी सुद्धा तिच्याबरोबर जात असे. त्या दिवशी चिमुटभर साखरे ऐवजी काकू आवर्जून  पेढा किंवा बर्फीचा तुकडा, आंब्याची फोड, फणसाचा एखादा गरा असा विशेष खाऊ द्यायच्या. त्यांचे कोणी ना कोणी नातेवाईक कोकणातून येतजात असतं म्हणून हा कोंकणी मेवा त्यांच्याकडे फक्त मिळायचा तोही ठराविक दिवसात. लहान मुलंच आम्ही खाऊची अपेक्षा असणारच त्यात नवल ते काय? पण आईला मात्र ते खपंत नसे, तिकडे जाताना ती माझ्या मागोमाग येऊ नकोस असं बजावून सांगून जायची पण ऐकणार ती मुलं कसली वडिलांनी बोलावलं हा हुकमी निरोप आम्हाला आईच्या ओरड्या पासून वाचवत असे. हा सगळा घाट मिळणाऱ्या चिमुटभर साखरे साठी किंवा खाऊच्या तुकड्यासाठी, हे आताच्या काळात ऐकायला कदाचित विचीत्र वाटेल पण ज्यांनी हे अनुभवलं आहे ते नक्कीच चाळ/वाडा संस्कृतीत वाढलेले असणार.  ते दिवसच असे होते की सगळी चाळंच आमचं घर असायचं परकेपणा, कोणी नावं ठेवेल अथवा हावरट म्हणेल हा विचार करण्याचं वय नव्हतं आणि चाळीतले कोणी रागावलं तरीही आपलेपणा हक्क वाटंत असे त्याचा राग येत नव्हता आणि पालक सुद्धा मध्ये पडत नसत. कारणाशिवाय कोणी रागावणार नाही हेच ऐकायला मिळणार. जो हक्क खाऊचा तोच किंबहुना जरा जास्तच रागवण्याचा अगदी सगळ्या काकवांना होता हे गृहीत असायचं. 

            ही चिमुटभर साखर घरोघरी फक्त हातावर ठेवली जायची असं नाही तर ती देवापुढे सुद्धा ठेवली जायची. शाळेच्या निकालाच्या दिवशी, नोकरीचा कॉल आला की, नवीन कपडे अथवा गृहउपयोगी वस्तू खरेदी केल्यावर ती देवापुढे ठेवून त्या सोबत साखर ठेवण्याची पद्धत होती आजही आमच्या कडे आणि बऱ्याच घरांमध्ये ही परंपरा चालू असेल नक्कीच. घरात काही गोड केलं की आधी देवापुढे ठेवून मगच वाटून खाल्लं जायचं. हळूहळू घरी गोड बनवणं कमी झालं असलं तरी चिमुटभर साखर आजही आपला मान ठेवून आहे हे निश्चित. आमच्या मनातली तीची चव, आठवण आणि ओढ अजुनही आहे तशीच आहे. आजही मी घरी आलेल्या बायकांना हळदकुंकू लाऊन चिमुटभर साखर देते.  त्या गोड आठवणी, ती संस्कृती  नकळत झालेले संस्कार ताजे ठेवण्याचा प्रयत्न करते.  

    मनात रुंजी घालणाऱ्या अशा अनेक आठवणींचा खजिना प्रत्येक स्त्रिच्या मनातला एक हळुवार कोपरा भरून राहिलेला असतो जो तिच्या रोजच्या जीवनाला एक वेगळीच टवटवी देतो.

      

   

                                     सौ.मंजिरी जानोरकर