रम्य ते दिवस

     “मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना,

            जे कधी ना परतुन आले..”

    भूतकाळात, भविष्य काळ आणि जो चालू आहे तो वर्तमान काळ. माणसाला नेहमीच भविष्याची उत्सुकता किंवा चिंता असते आणि भूतकाळात तो कायमच रमतो हे वास्तव आहे. वर्तमान काळा विषयी मनुष्य जरा बेफिकीरच असतो. आला दिवस जगण्यात तो संपत असतो. गेलेल्या किंवा संपलेल्या गोष्टींवर, विषयावर बोलायला सगळ्यांनाच जरा जास्त आवडते पण म्हणून भूतकाळात ती व्यक्ती फार आनंदी होती असेही नक्कीच नाही. त्याचे कारण कोणीही आयुष्यात सुखाचे क्षण लक्षात ठेवत असतो आणि त्यातच रमत असतो. सुखाचे क्षण पुनःपुन्हा आठवण काढून ते मोठे करून पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला जातो.  

      भूतकाळात जगताना आजचा वर्तमान हाही उद्याच्या आठवणीत जमा होणार आहे याचे भान ठेवून खरंतर रोजचाच दिवस आनंदात घालवला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण तेंव्हाच उपभोगता आला पाहिजे. सुख असो वा दुःख ते स्विकारता आलं पाहिजे,जगता आलं पाहिजे. त्या सगळ्यांचीच आठवण जपणं आवश्यक आहे. दुःखद किंवा कटू आठवणी बरंच काही शिकवून जातात तर सुखाच्या आठवणीने मनाला प्रसन्नता लाभते. जे काही आपण जगतो आहोत किंवा पूर्वी जगलो आहोत ते सगळे आपल्या पुरतं का होईना पण महत्वाचे आहे हे आधी मान्य करायला हवे. कारण कोणत्याही गोष्टीचा ‘स्विकार’ केल्याशिवाय त्याचा आनंद मिळत नाही आणि कटू अनुभव वाटून इतरांना शहाणे करु शकत नाही. इतिहास म्हणजे सुद्धा भूतकाळच असतो आणि तो आवर्जून शिकवल्या जातो हे वास्तव आहे. 

       महान लोकांच्या यशापयशाचा इतिहास अभिमानाने सांगितला जातो आणि सामान्य माणसाचा प्रवास हा लूप्त होतो पण म्हणून त्याची काहीच किंमत नाही असं नाही.

        प्रत्येक वेळी आठवणी सुखदुःखाच्या किंवा प्रेरणादायी असव्यात असं नाही. बरेचदा गंमतीदार आठवणी सुद्धा असतात आणि नको त्या वेळी नको त्या आठवणी सांगणारे घरोघरी असलेले मेंबर्स, मित्र मंडळी हे संधी साधून हास्याचे फवारे उडवण्याची जबाबदारी मनापासून पार पाडताना दिसतात. तर एकूणच जुन्या वस्तू, आठवणी, जुने दिवस हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि पुन्हा परत मिळवता येणार नसतो. म्हणूनच आठवण काढत काढत नव्याने आठवणी तयार करून त्याही जपल्या पाहिजेत आणि गंमतीदार पद्धतीने सांगितल्या पाहिजेत. त्यांतच खरी गंमत आहे.

  पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

                                सौ.मंजिरी जानोरकर.