। “काकू…काकू अहो काकू, प्रभाताई!!” इतक्या हाका मारल्यावरही न थांबणाऱ्या काकू म्हणजेच प्रभाताई लगेच थांबल्या. मागे वळून पाहताना,” अगं तू होय ?” असं विचारत नाजूक हसल्या. “तुला माझं नाव कसं ग माहीत? काकू काय हल्ली कोणीही कोणालाही म्हणतं, ना वय पाहात, ना त्या व्यक्तीचे मत. स्त्री ला काकू अन् पुरुषांना काका करण्यात कसली धन्यता वाटते कोणास ठाऊक?? हं बाकी तू बोल समिरा.” असं म्हणून काकूंनी माझ्याकडे पाहत विचारले पण इतक्या वर्षांनी भेटल्यावर माझंही नाव त्यांनी बरोबर ओळखलं होतं. तर झालं असं की प्रभाताई माझ्या मैत्रिणीच्या आई, कॉलेजमध्ये असताना मी प्रियाच्या घरी रोज जात असे. प्रिया पेक्षा काकूंशी माझं जास्त मेतकूट जमायचं. प्रिया चिडून कधीकधी म्हणायची देखील ही समिराच तुझी लेक असायला हवी होती. कधीतरी गप्पांच्या ओघात मी त्यांना त्यांचे नाव विचारले होते, “प्रभा” असं गोड हसून त्यांनी सांगितले मग म्हणाल्या खरं सांगू समिरा, हे माझं आईने ठेवलेलं नाव इकडे मी सुमन आहे पण मला प्रभा म्हणलेलच जास्त आवडतं. आता कोणीही त्या नावाने हाक मारणारं राहीले नाही गं. आई बाबा गेले आणि नावही ते दोघे होते तोवर आवर्जून प्रभा म्हणून हाक मारत. हे सांगताना काकू जरा हळव्या झालेल्या जाणवल्या. अर्थात मी लहान होते त्यांचं ते हळवं होणं मला त्या वयात नाही जाणवलं पण ते नाव मात्र लक्षात राहीलं. आज जवळपास पंचवीस वर्षांनी मी काकूंना भेटल्यावर का कोण जाणे पण मला ते नाव आठवलं आणि तोंडातून बाहेर पडले. तशी प्रिया आणि मी नेहमी भेटतो, एकमेकींच्या आईवडलांची चौकशी सुद्धा करतो पण प्रत्यक्षात काकूंची भेट खूप वर्षांनी झाली. मी त्यांना आवर्जून घरी घेऊन गेले त्या नाही म्हणत असताना. इतक्या दिवसांनी भेटल्यावर सुद्धा आम्ही दोघेही अगदी तशाच गप्पा मारत होतो, जणू मधला काळ लुप्त झाला आहे. आमच्या भेटीचा अखंड ओघ सुरू आहे असंच काहीसं वाटत होतं. ” काकू तुम्ही अगदी जशाच्या तशा दिसता अजून छान वय मुळी सुद्धा जाणवत नाही.” ” वय जाणवत नाही तरी आठवण करून देणारे आसपास खूप जण आहेत. बागेत फिरताना, रस्त्यावर चालताना उगाच,” काकू कडेने जा, रस्ता क्रॉस करून देऊ का? अशी नको इतकी सहानुभूती दाखवतात. काळजी समजू शकते गं मी पण जीना चढताना हातातील सामान धरायला कोणी येत नाही किंवा बस मध्ये जागा देत नाही मग कुठे जातात ही मंडळी. अर्थात मला राग नाही येत हो, जो तो आपापल्या विवंचनेत असतो पण काका किंवा काकू, मावशी हे तुमच्या वयाच्या मुलामुलींनी म्हणणं ठिक आहे पण काही ज्येष्ठ नागरिक विशेषतः पुरुष वर्ग जो आमच्याच वयाचा असतो तो सुद्धा ताई, मेडम म्हणत नाही, यांना सुद्धा काका अन् मला काकू काय हे?? त्यांचा राग येतो. तुला वाटेल मला या वयात हे काय सुचतंय पण तू सांग समिरा पूर्वी आपण आपल्या वयाच्या लोकांना सहज नावाने हाक मारायचो त्यात आपलेपणा वाटायचा, हक्क जाणवायचा. आता पोकळी जाणवते गं, दुरावा जाणवतो. जवळपास आपलं कोणीच नाही असं वाटतं. काकू म्हणणं गैर नाही पण लेबल लावून नातं नाही निर्माण होत. ती ओढ टिकून राहावी लागते. या वयातही आपल्याला नावाने हाक मारणारं आपलं जवळचं कोणीतरी आहे ही जाणीव सुद्धा शीतल वाटते. असो तुला नाही कळायचं ते पण तू मात्र मला आईच्या माझ्या माहेरच्या नावाने हाक मारलीस आणि एकदम छान वाटलं मन पिसासारखं हलकं हलकं झालं. आपलं नाव आपली फक्त ओळख नसते तर ती एक आठवण असते विशेषतः आपल्या स्त्रीयांची. ” कुठेतरी हरवल्या सारख्या काकू बोलून गेल्या. नंतर बराचवेळ थांबून आणि मनसोक्त गप्पा मारत आम्ही मनमोकळ्या झालो अगदी दोन मैत्रिणींसारख्या. प्रभाताईंना निरोप दिल्यानंतर मी आई, काकू, मावशी सगळ्यांना फोन लावून त्यांना त्यांच्या माहेरच्या नावाने हाक मारली आणि मला त्यांच्याशी बोलताना एक वेगळीच मजा वाटली आणि त्यांच्या बोलण्यातून ती भावना जाणवली ज्याचं प्रभाताई विश्लेषण करू शकल्या नव्हत्या.
सौ. मंजिरी जानोरकर

