कथेमागची दंतकथा

       जुन्या परंपरांना जसा इतिहास असतो तशाच किंबहुना जरा जास्तच दंतकथा सुद्धा जोडलेल्या असतात. ऐतिहासिक वास्तू , किल्ला इतकेच नाही तर थोर पुरुषांच्या मागे सुद्धा या कथा चिकटलेल्या किंवा चिकटवल्या गेलेल्या असतात. राजस्थान पाहताना तर पदोपदी हे जाणवते. कित्येकदा मनाला न पटणारे प्रसंग शौर्य कथा म्हणून ऐकवले जातात. त्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रश्नच नसतो कारण तो भावनिक मुद्दा झालेला असतो. लोकांना हे कळून घ्यायचेच नसते की हा विरोध त्या व्यक्तीला अथवा त्यांच्या महानतेला नाही तर त्यांच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या गोष्टींना आहे. 

      असो, सध्या ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनत आहेत ही आनंदाची बाब आहे. पूर्वी सुद्धा अनेक ऐतिहासिक गोष्टींवर, थोर पुरुषांच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत पण काही काळापूर्वी वास्तव समजून घेण्यासारखी परिस्थिती होती. मुलं, विद्यार्थी, सामान्य माणूस हा इतिहासाशी जोडला गेलेला होता. आजच्या इंग्रजाळलेल्या आणि कधीही इतिहास न ऐकलेल्या जनसामान्यांना हातात तलवार घेऊन लढणं म्हणजे काय थ्रील आहे, शत्रूचा वेढा असताना किल्ला सोडणं आणि स्वतःला सुरक्षित करणं, वेळप्रसंगी दोन हात करणं म्हणजे काय आणि किती कठीण असेल हे समजण्यासाठी चित्रपटात ती दृश्य लाऊड आणि डार्क शेड मध्ये दाखवणं गरजेचं होत आहे. रक्तरंजित संघर्ष हा शब्दशः चित्रीत करावा लागतो त्या शिवाय त्यांचा प्रभाव पडत नाही. कदाचित दंत कथांच्या बाबतीत त्याकाळी हेच झाले असावे. त्या मुळे, त्या प्रसंगांना न्याय मिळेल असं त्या काळच्या लोकांना वाटले असेल तर चूकीचे ठरवता येणार नाही. आजची  पिढी ही पूर्वी इतकी इनोसंट सुद्धा राहीलेली नाही. प्रत्येक गोष्टी पडताळून पाहणे, शहानिशा करून घेणं हा त्यांचा स्थायीभाव झालाय. मोबाईल फोन मुळे बाहेरचं जग प्रत्यक्षात फार कमी पाहीलं गेलंय. त्यामुळे जुन्या मूर्ती, देवस्थानं आणि त्या मागच्या कथा-दंतकथा आणि त्या तश्या सांगण्या मागची कारणं आताच्या पिढीला पटवून देणे आवश्यक आहे. हेच सगळं इतिहासाच्या बाबतीतही लागू होतं.                  एकंदरीत इतिहास, ऐतिहासिक प्रसंग, महापुरुषांचे विचार, आणि त्या वेळेची परिस्थिती या सगळ्यांची सांगड आताच्या काळात समजून देणं आणि घेणं सोपं करण्याकरता कालानुरूप आवश्यक ते बदल करावे अथवा प्रसंग जोडावे लागतात. ती त्या वेळेची गरज म्हणता येऊ शकेल. म्हणुनच त्या गोष्टींना, प्रसंग  चित्रीत करण्याच्या पद्धतीला चूकीचे न ठरवता, पूरकच समजलं जाणं महत्वाचे आहे. हे सगळं करत असताना दाखवणाऱ्यांनी किंवा कथा सांगणाऱ्यांनी मात्र याचे भान ठेवले पाहिजे की करावे लागलेले बदल हे मूळ घटना, प्रसंग यांना धक्का लागू न देणारे आणि योग्य इतिहास समजण्यासाठीच असले पाहिजे. पुढे हस्तांतरित केला जाणारा इतिहास हा दिशादर्शक आणि मार्गदर्शन करणाराच असला पाहिजे, ना की समाजात तेढ निर्माण करणारा अथवा गैरसमज पसरवणारा. पुढील पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणाराच असला पाहिजे. 

            इतिहास हा चूका टाळण्यासाठी आणि योग्य प्रसंगांची पुनरावृत्ती करण्याकरता जाणून घेणं आवश्यक आहे. हे समजणं आणि मान्य करणं अपेक्षित आहे.  वादंग, दंगेधोपे, चिखलफेक, जातीय दंगल हे टाळण्यासाठी इतिहासाचा वापर झाला तर खऱ्या अर्थाने इतिहास धन्य होईल हे निश्चित आणि कथांच्या मागची दंतकथा तसेच प्रसंगामधून चित्रीत केली जाणारी अतिरंजीतता यशस्वी ठरेल. 

                     ‌       सौ मंजिरी जानोरकर.