मनस्वी

      शशीकांतराव आणि सीमा ताई, एक मुलगा आणि एक मुलगी सुखी मध्यम वर्गीय चौकोनी कुटुंब. मुलं यथावकाश मोठी झाली आणि लग्न होऊन मार्गी लागलेली. सीमाताई आणि शशीकांतराव मुलगा आणि सून यांच्या सोबत आनंदाने एकत्र राहत होते. शक्य तेवढी मदत सीमाताई सुनेला करत असत तीला सुद्धा त्याची जाणीव असे. सगळंच नीट चाललेलं अचानक दोन दिवसांच्या आजाराचं निमित्त होऊन सीमाताई गेल्या आणि घर जणू एकदमच रिकामं झालं आहे असं सगळ्यांनाच वाटायला लागलं. गृहिणी असलेल्या सीमाताईंच खरं अस्तित्व त्या गेल्यावर शशिकांतरावांना जाणवले. ते अगदी एकटे पडले तशी सुन आणि मुलगा, मुलगी होती पण…  

       शशीकांतराव स्वतःच्याही नकळत घरातली जमतील तशी सीमाताईंची कामं करायला लागले. कपडे वाळत घालणे, भाजी आणून देणे,निवडणे वैगेरे. ही कामं त्यांनी याआधी कधीही केली नव्हती. तसं त्यांना कोणी काही सांगितले नव्हते पण अगदी सहजच त्यांनी ती जबाबदारी घेतली होती खरंतर यांत्रिकपणे.

     आज सीमाताईंना जाऊन एक महिना झाला होता आणि मुलं आपल्या आपल्या उद्योगाला लागली होती. शशीकांतराव एकटे घरांत सीमाताईंचा फोटो हातात घेऊन विचार करत बसले होते. ” किती मनस्वी होतीस तू सीमा? प्रत्येक गोष्ट मनापासून, अगदी चिडणं सुद्धा. तू असताना फक्त गृहीत धरलं मी तुला. तू नसशील कधीतरी असं वाटलही नाही कधी, तू मात्र तुझं खरं केलंस, मी कधीच म्हातारी होणार नाही असे म्हणायचीस आणि साठी येण्या आधीच..”  डोळ्यातलं पाणी टिपत शशीकांतराव विचार करतच राहीले, ही कधी आजारी असलेलं आठवतच नाही, तसं किरकोळ काहीबाही झालं तरी ड्राव्हर उघडून एखादि गोळी घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रेश! अशी की, “तुला आता बरं वाटलं का?”  हे विचारायचं सुद्धा लक्षात येऊ नये. तुला मात्र नेहमी असंच वाटायचं की माझं तुझ्याकडे लक्षच नाही मी  प्रेम करत नाही,  हा विचार करत ते गालातल्या गालात हसले. आजारपणं कायम माझीच मक्तेदारी असल्यासारखा मी सतत दवाखाना, डॉक्टर, हॉस्पिटल आणि या सगळ्यात तुला मी कायमच गृहीत धरलं. यात तुला होणारा त्रास, वाटणारी काळजी मला कळायची नाही असं नाही पण तेव्हढं होणारच हेही मी गृहीत धरलेलं असायचं. औषध पाण्यानं मी बरा होत होतो आणि काळजीनं तू मात्र खंगत होतीस हे कधी जाणवलंच नाही ग, म्हणूनच दोनच दिवसात अशी निघून गेलीस, तुला कळलं होतं ना दवाखान्याच्या चकरा मारताना काय घालमेल होते ते म्हणूनच…… 

       विचार आणि अश्रू दोन्ही थांबत नव्हते. आता मात्र मी तुला हवं तसं वागणार आहे बरंका असं फोटो कडे बघत स्वतःशीच ठरवतं शशीकांतराव उठले.  उद्या पासून मी उठल्यावर पांघरूण घडी घालून ठेवणार, ओला  टॉवेल वाळत टाकणार, रोज पुजा करणार, भरपूर पाणी पिणार आणि स्वतःची काळजी घेणार  तू म्हणशील आधी केलं असतं तर??  पण खरं सांगू तुला चिडवतान मला गंमत वाटायची तुझं माझी काळजी करणं आवडायचं, पझेसिव्ह असणं सुखद वाटायचं पण तू विलक्षण मनस्वी होतीस हे सगळं करताना तू इतकी गुंतली होतीस की याचा तुला त्रास होत असेल असं वाटलं नव्हतं. खरंच मला हे सगळं आधी का नाही कळलं?  आता हे सगळं करूनही मला आनंद मिळणार नाही कारण तुझ्याशिवाय  तो अशक्य आहे. आता पुजा केली तरी फुलं संपली आहेत उरलंय ते आठवणींच निर्माल्य…… 

     रडून लालसर झालेले डोळे पुसत शशीकांतराव उठले, फोटो भिंतीवर अडकवून ठेवला आणि यांत्रिकपणे कामाला लागले अगदी सीमाताईंसारखे……

                         सौ. मंजिरी जानोरकर.