Watsapp लग्न

     गिरीजाच्या मुलीचं म्हणजे गार्गी चं लग्न अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलं होतं. खरेदी चालूच होती. कार्यालय, केटरर्स ठरवुन झाले होते. मेन्यू ठरवण्या साठी त्यांचा सारखा फोन येत होता पण सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवणं जमत नव्हतं. गिरीजा त्याला रोज काहीतरी कारण देउन टाळत होती. पत्रिका वाटण्याचं सगळ्यात वेळकाढू आणि मोठं काम मात्र व्हॉट्सअँप मुळे बरंच सोपं झालं होतं. गिरीश आणि गिरीजा दोघांनी मिळून (अगदी  पारंपरिक कपड्यात ) आमंत्रणाचा एक छान व्हिडिओ करून सगळ्यांना टाकला होता. शिवाय शक्य तितके फोन सुद्धा केले होते.  गिरीजाच्या सासुबाई मात्र या बाबतीत थोड्या नाराजच होत्या, “हे कसलं मेलं आमंत्रण? पत्रिका देण्याच्या निमित्ताने सगळ्यांकडे जाणं होतं, अगत्याचे प्रेमाचे चार शब्द बोलले जातात, शिवाय रोज एक छान साडी नेसून नवऱ्याबरोबर मिरवता येतं ते वेगळंच. ”  असं हे त्यांचे म्हणणे गिरीजाला पटायचंही खरंतर पण नवरा आणि लेक तिला,”सगळे समजून घेतात गं हल्ली.” असं सांगून गप्प करत होते तरीही सगळे येतील ना या असल्या आमंत्रणावर अशी  भीती सतत तीच्या अंतर्मनात दडलेली असे. 

      लग्न पंधरा दिवसांवर आले आणि गिरीजा सकाळपासून बॅगा काढून ठेवणे, पुसून त्या व्यवस्थीत आहेत ना हे पहात होती. दुपारच्या वेळात माळ्यावर तिला एक जुनी पेटी सापडली त्यात गार्गीच्या बाहुल्या त्याचं लग्न लाऊन कोऱ्या कपड्यात तशाच ठेवलेल्या दिसल्या. बाहुलीला सासरी पाठवून या पेटीत ठेवून ती विसरून गेली असणार. गिरीजा मात्र त्या आठवणींनी अधिकच हळवी झाली. डोळे पाणावले आणि समोरचं सगळंच धुसर झाल.  

       चला लवकर बॅगा गाडीत भरा आवरा पटापट, पाहुणे येण्याआधी आपण जाणं गरजेच आहे. गार्गी येईल मागाऊन. आज्जी तळमळीने बोलत होत्या. घाईगडबडीत गिरीश, गिरीजा आणि गार्गीची आत्या गार्गी ला औक्षण करून गाडीत बसले. एव्हाना पाहुणे आले असतील जरा उशीरच झाला आपल्याला असं वाटून ते  कार्यालयात पोहोचले. अजुन तरी तिथं कोणी आलं नाही हे पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. “गार्गी बाळ आम्ही पोहोचलो आहोत तुम्ही सुद्धा या लवकर.”  न राहवून गिरीशनी फोन केला. आत गेल्यावर तिथली तयारी करून तिघेजण बाकी मंडळींची वाट पाहत बसले. थोड्या वेळात गार्गी तिच्या मैत्रिणी आणि आज्जी सोबत आली. काही वेळाने नवरा मुलगा, आई वडील आणि त्यांचे जवळचे काही जण आले. परंपरागत स्वागत आणि बाकीचे विधी यथासांग पार पडले. आता कपडे बदलून रात्रीचं सीमांत पूजन सुरू करायला हवं पण गंमत म्हणजे दहा पंधरा जणांच्या वेतिरीक्त तिथे कोणी अजून आलंच नव्हतं. येतील लोक हळूहळू असं वाटून कार्यक्रम सुरू केला खरा पण तो संपत आला तरी कोणी येण्याची चिन्हे दिसेनात मग तुम्ही बोलावल होतं ना अशी विचारणा एकमेकांमध्ये सुरू झाली. दोन्ही घरच्या मंडळींनी हौसेने नाच बसवले होते, हास्य विनोद करायचे ठरवले होते पण कार्यालय रिकामं रिकामं वाटत होतं म्हणून सगळे कार्यक्रम अघोषित रद्द करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच तऱ्हा कोणी म्हणता कोणीच कसं येईना म्हणून सगळ्यांनी लोकांना फोन लावायला सुरुवात केली तर हॉल मध्ये म्हणे watsapp call  कनेक्शन आहे त्यावरून सगळीकडे लिंक पाठवायची व्यवस्था असते, तिथे तशी सुचनाही लावली आहे उलट कालपासून आम्ही on line  लिंकचीच वाट पाहत होतो.🙆🏻 अशी उत्तरे आली आणि काल मंडळी का आली नाही, ह्याचा उलगडा झाला हे सगळं ऐकून गिरीजा मात्र धक्क्याने खालीच बसली आणि तिला रडूच फुटले….  तीचा रडण्याचा आवाज ऐकून गिरीश आणि गार्गी धावत आत आले, ” गिरीजा अगं गिरीजा, आई अगं आई काय झालं असं काय करतेस ऐक ना का रडतेस.” असं तिला विचारत असताना तिनं डोळे उघडले बाजूला जुनी पेटी पडली होती आणि हे दोघं घाबरून तिला उठवत होते. दोन क्षण सावरल्यावर आपण स्वप्न बघत होतो हे एव्हाना गिरीजाच्या लक्षात आले होते. डोळे पुसत तिनं हे स्वप्न त्या दोघांना सांगितले आणि दोघंही खळखळून हसत तिची चेष्टा करायला लागले अन् गिरीजा ते दृश्य मनापासून मनात साठवून ठेवत होती तिच्या एका डोळ्यात आसू अन् एका डोळ्यात हसू होते.  

      सौ. मंजिरी जानोरकर