केक कापणे इज मस्ट

     सावित्रीबाई फुले शाळेत ३५ वर्षे शिक्षिका आणि शेवटी पाच वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम केल्यानंतर आज अखेर वसुधाताई  सेवा निवृत्त होणार होत्या. सगळ्यांच्या लाडक्या बाईंना  sendoff  देण्याची आणि सोबतच एक serprise  पार्टी विद्यार्थी आणि सहशिक्षकांनी ठरवली होती. तशी कुणकुण वसुधाताईंना आधीच लागली होती. त्यांनी त्यांच्या एका शिक्षक मैत्रिणीला बोलावून,” कार्यक्रम तुम्ही ठरवा पण फक्त केक कापणे नको.”  असं आवर्जून सांगितले. तसा सगळ्यांचा विरस झाला पण ठीक आहे म्हणून तो बेत रद्द केला.  सगळा कार्यक्रम छान झाला. लाडक्या बाईंना छानशी साडी भेट म्हणून दिली, सगळ्यांचे मनोगत झाले, न राहवून मगासच्या मैत्रीणीने बाई तुमची हरकत नसेल तर एक विचारू का असं म्हणून केक न कापण्याचे कारण विचारले.      सगळ्यात शेवटी बाई बोलायला उभ्या राहिल्या,” माझ्या सहकारी बंधु आणि भगिनींनो तसेच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपण आपल्या शाळेतर्फे दरवर्षी एका अनाथाश्रमाला भेट देतो हे तुम्ही जाणताच. मी मुख्याध्यापिका या नात्याने त्या आश्रमात आधी जाऊन येते. त्यांना नेमकी काय मदत हवी आहे ते विचारते आणि त्या अनुषंगाने सगळं ठरवते, तुम्ही म्हणाल त्याचं आत्ता इथे काय? पण केक कापणे का नको? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हे गरजेचे आहे. मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आश्रमात जाऊन आले आहे. आजकाल वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, साखरपुडा, लग्न, मुंज, निवृत्ती,  एवढेच काय तर प्रमोशन किंवा कोणतंही सेलिब्रेशन, पार्टी काहीही असो केक कापणे इज मस्ट! असं होउन बसलय आणि मग हे केक कापून वाट्टेल तसे चिवडले जातात आणि आहे तिथेच टाकून दिले जातात यात गंमत अशी आहे की कोणीतरी संवेदनशील व्यक्ती हे केक वाया जायला नको म्हणून अनाथ आश्रमात पाठवतात किंवा रस्त्यावर प्राणी खातील म्हणून कडेला ठेवून देतात. शिवाय आश्रमात जाऊन सुद्धा वाढदिवस साजरे करणारे लोक आहेतच जे त्या मुलांना काय हवंय यापेक्षा त्यांना काय परवडेल तेच वाटतात आणि मग केक, पावभाजी, पुलाव असं सोईस्कर सगळं दिलं जात असतं. तिथे गेल्यावर या पदार्थांनी भरलेले त्यांचे फ्रिज मी पाहिले आहेत. या सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना जास्त त्रास होतो. कारण सतत तेच तेच खाऊन मुलंही कंटाळतात. यापेक्षा आपल्या ऐपतीप्रमाणे काही रक्कम जमा केली तर ती जास्त उपयुक्त ठरेल असं मला वाटतं म्हणून सुरवात मी माझ्यापासून केली इतकंच.  बरेचदा रस्त्याने जाताना सकाळी सकाळी कचराकुंडी जवळ अर्धवट सोडून दिलेले केक मी बघते प्राणी सुद्धा त्याला तोंड लावत नाही ही वस्तुस्थिती आहे. दरवर्षी आपण या अनाथ आश्रमात त्यांना विचारून कधी शालेय उपयोगी वस्तू, कधी कपडे तर कधी स्वेटर, शाली किंवा त्या वेळी जे आवश्यक आहे असे जिन्नस देत असतो. मी आशा करते की माझे सहकारी हा उपक्रम यापुढेही असाच सुरू ठेवतील.”  “आपण  सगळेच भारतीय आहोत आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी…. अशी प्रतिज्ञा  आपण  करतो पण ते पाळतो का??  आपल्याकडे कोणत्याही शुभ प्रसंगी औक्षण करण्याची पद्धत आहे. त्यातील हेतू शुद्ध आणि आशिर्वाद देण्याचा आहे केक कापणे अगदी अयोग्य किंवा चूकच आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही पण कोणता कार्यक्रम आहे आणि त्या व्यक्तीला काय आवडतं ते दिलं तर ते जास्त योग्य तसेच आनंददायी होईल असे मला वाटते.

 असो आता तुमच्या सगळ्यांच्या साठी माझ्या कडून एक गंमत असं म्हणत वसुधाताईंनी दाराकडे बघत कोणाला तरी आत बोलावले. एक मोठा डबा घेऊन शाळेच्या मावशी आत आल्या त्यांनी डबा उघडला आणि खमंग गोड वास सगळ्यांच्या नाकात शिरला. काय असेल असा विचार करून सगळ्यांची भूक चाळावली. गरमागरम ओल्या नारळाच्या करंज्या सगळ्यांना वाटल्या गेल्या आणि बाहेर मसाले भात वाट बघत आहे असं म्हटल्यावर सगळी मुलं आणि सहकारी शिक्षक सगळेच जण खूष झाले आणि मनसोक्त खाण्याचा आणि गप्पांचा आनंद घेतला.

 कथा आवडल्यास नक्की शेअर करा.

          सौ. मंजिरी जानोरकर