मैथिलीच्या मुलीचं लग्न ठरलं. सुहानी मैथिली आणि निखिलची एकुलती एक कन्या. मैथिलीच्या माहेरी दोन भाऊ-भावजया आणि त्यांची प्रत्येकी दोन मुले तसंच सासरी तीन नणंदा आणि एक दीर त्यांची मुले, असा भरापूरा परीवार आणि सुहानी. सुरवातीपासूनच निखिल आणि मैथिली सगळ्यांशी जरा अंतर ठेवूनच वागले त्यामुळे सुहानी सुद्धा तशी अलिप्तच होती काका काकू, मामा मामी यांच्या सोबत जेवढ्यास तेवढं बोलणं. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटणं. खरंतर सगळेचजण एकाच शहरात पण कारणाशिवाय येणं जाणं नाही. कधी मामाच्या घरी, आत्याच्या घरी सुट्टीच्या दिवशी जाऊन राहाणं किंवा भावंडांना घेऊन राहाणं नाही. सुहानी सगळ्या भावंडात तशी मोठी होती पण लाडकी ताई कोणाचीच नव्हती. मैथिली सुद्धा फक्त आईशी फोनवरून बोलत असे स्वतः सुद्धा आईला भेटायला येई मग आई जिकडे असेल त्यांच्याशी संवाद. बाकी आवर्जून भावांना भेटणं नाही. म्हणूनच सुहानीचं लग्न ठरलं हे ऐकून वाटणार आनंद फोर्मल होता अगदी सगळ्यांना. लग्न ठरवताना देखील कोणाचीही इनव्होलमेंट नव्हती अगदी सासर माहेर दोन्ही कडून. लग्न घर म्हणून नाही म्हणायला आई येऊन राहीली होती, सासूबाई बेडरीडन असल्याने असून नसून सारख्याच होत्या. बाकी जावेला आणि भावजयांना मुहूर्त करण्यापुरत़ बोलावलं होतं. बाकी सगळी खरेदी, साड्या, भांडी, देणं घेणं ही सगळी खरेदी नवीन नातं झालेल्या विहीणबाईं बरोबर दोघी मायलेकींनीच केली. गृहमुखाचं एकवेळचं जेवण आणि त्याच दिवशी चार जणींना मेंदी लावली आणि आणून ठेवलेल्या बांगड्या टोपलीत ठेवून हव्या तशा घ्या अशा पध्दतीने देण्यात आल्या. लग्न घर असूनही कार्यालयात जाईपर्यंत कोणीही घरात नव्हते. सगळ्यांना परस्पर येण्याचं अप्रत्यक्षपणे सुचवलं त्यामुळेच घरातून निघताना मुलीला औक्षण करायला माम्या,आत्या,काकू कोणीच आलं नाही.
लग्न सोहळा पार पडला. सुहानी सासरी गेली आणि सगळे आपापल्या घरी. सुहानीचं सासर पाहुण्यांनी गजबजलेलं होतं. मामी, मावशी, आत्या, काकू सगळेचजण ८ दिवस आधी आणि नंतर मुक्कामी होते. कधी इतक्या मोठ्या भरल्या घराची सवय नसल्याने सुहानी बावरून गेली. सगळ्यांनी हौसेनं तिचं स्वागत केलं. बच्चे कंपनीला तर कोण उत्साह आला होता. काहीजण वहीनी तर काही जण मामी म्हणून तीला भंडावून सोडत होते. तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता. लग्नाआधी ती दोनतीनदा तरी हा गोंधळ पाहून गेली होती पण आज ते तिच्या अंगावर येत होतं. खुप दमल्या मुळे शांत झोप हवी होती. मात्र इथे तर तिला कोणी तीच्या खोलीत सुद्धा शांतपणे बसू देत नव्हतं. मनातून त्रासलेली सुहानी दोन दिवस कसंबसं सहन करून तिसऱ्या दिवशी तापाने फणफणली. नवीन नवरी आजारी पडली म्हणाल्यावर सगळेचजण तिची काळजी घेत होते. सगळं काही तिला हातात मिळतं होतं. गरमागरम वरणभात बच्चे कंपनी गोष्टी सांगत भरवत होती. तिच्या नणंदा रूम आवरून जात होत्या. आजारपणामुळे नवदाम्पत्याला बाहेर पाठवणं लांबणीवर पडलं. पाहुणे आल्या सारखे ४ दिवस राहू गेले. हीची काळजी मात्र सासूबाई जातीनं घेत होत्या. सगळे पाहुणे रोज फोनवरून चौकशी करता करता चिडवतही होते. आधी नको वाटणारी ही गर्दी आणि कौतुकं आता तिला ही हवंहवंसं वाटू लागले. त्यांच्यातील प्रेम आपलेपणा तिला जाणवला. काही दिवसांतच सुहानी बरी झाली आणि जोडी फिरून आली. जरा बदल म्हणून सासूबाईंनी तिला ४ दिवस माहेरी पाठवले. सासरच्या भरल्या घरातून आईकडे आल्यावर खरंतर तिला छान वाटायला हवं होतं पण इकडे आई आणि बाबा यांच्या वेतिरीक्त आजारी आज्जी बस. सुहानी एकदोन दिवसांत कंटाळली. आपल्या काकू, मामी, भावंडांना फोन करून तिनं भेटायला बोलावले. सगळेजण अचानक बोलावलं म्हणून गडबडीत आलेही. इकडे हीने स्वयंपाकवाल्या मावशींना सांगून पावभाजी,पुलाव करून घेतला. स्वतः बाहेर जाऊन स्वीट्स आणले. संध्याकाळी सगळं घर भरून गेलं. सुहानी ने आवर्जून लग्नात घेतलेले आणि कोणाला न दाखवलेले दागिने घातले छानशी साडी नेसली. मस्त तयार होऊन सगळ्यांचं स्वागत केले. भरभरून गप्पा मारल्या तिचा बदलेला रागरंग बघून माम्या, आत्या खुश झाल्या. भावंडांनी हसवणं,चिडवणं सुरू केलं. घर आवाजाने आणि आनंदानें भरुन गेलं.
आज अंथरूणावर पडून असलेल्या आज्जीच्या चेहेऱ्यावर समाधान झळकत होतं. तीची नातं खऱ्या अर्थाने सासुरवाशीण झाली होती आणि जबाबदार सुद्धा.
सौ. मंजिरी जानोरकर

