प्रतिक्षाला गाडी काढताना बघून विमला काकूंनी तिला हाक मारली आणि जरा वेळ असेल तर वर येतेस का? असं विचारताच तिने लगेच हेल्मेट काढून परत डिकीत ठेवले आणि वर आली तोवर पहिल्या मजल्यावरील विमला काकूंनी दार उघडून ठेवले होते. “प्रतिक्षा अगं यावेळी परस्पर न भेटता निघालीस काही गडबड आहे का? पुन्हा उद्याही तू येत नाहीस हल्ली गौरी विसर्जन करायला मग भेट होत नाही लवकर म्हणून हाक मारली गं, आहे ना थोडा वेळ, असेल तर बस ना. एवढ्या दोन चार वर्षांत तुझं येणं अगदी कमी झालय नाही. पूर्वी कसं इथे एकत्रच होतात तुम्ही दोघी जावा अगदी एका घरात नाही तरी खाली वर राहायचात पण आता तू लांब गेल्यापासून जरा सुनंसुनंच वाटतं बघ, तसं गौरी गणपतीचा सोहळा तुमच्या घरात असला तरी आम्हाला ती लगबग आवडायची हो. आमचे सगळेच सणवार तिकडे लांब विदर्भात त्यामुळे जाणं येणं जवळपास तुटलेलं, त्यातून मी काही नवं करायचं म्हटलं की नकार ठरलेला असो एकूण काय मी तुमच्या घरातल्या आनंदावर समाधान मानते. तुम्ही सुद्धा कधी परकेपणा जाणवू दिला नाही हो पण आताशा निशा फारसं नाही बोलावत मला, बरोबरच आहे म्हणा आता तिची लेक मोठी झाली, तू सुद्धा असतेस माझी मेलीची लुडबुड कशाला. मी तक्रार नाही हो सांगत. तुला वाटेल काकूंनी ऐकवायला बोलवलं म्हणून….” त्यांचं वाक्य मधेच तोडत प्रतिक्षा जरा निवांत बसत म्हणाली, ” नाही काकू तुम्हाला मी ओळखत का नाही? ” असं म्हणून ती एकदमच शांत झाली आणि तिचे डोळे एकदम भरून आले. एखाद्या खपलीवरची जखम निघावी तसं तिचं मन आणि डोळे वाहायला लागले. तिने चटकन उठून दार बंद केले आणि मुसमुसायला लागली. काहीतरी बिनसलं आहे हे जाणून काकूंनी तिला मोकळं होऊ दिलं, ती शांत झाल्यावर पाणी दिलं. पाणी प्यायल्यावर प्रतिक्षा बोलायला लागली, “काकू तुम्ही मला लग्न करून मी आले तेंव्हापासून ओळखता एकत्र सणवार उत्सव या सगळ्यात माझा सहभाग किती जास्त असायचा हे सुद्धा तुम्ही पाहीले आहे. आधी आम्ही तिघी होतो आणि हळूहळू निशा आल्यावर चौघी झालो. कामं वाढली आणि करणारे हातही. हळूहळू घरात निर्णय घेण्यात एकसुरी पणा यायला लागला. निशाला सगळं आपण आपल्या मताप्रमाणे करावे असे वाटायला लागले. सासुबाई आणि काकूंनी वयोमर्यादा ओळखत आपला सहभाग कमी केला पण मी घरात मोठी असुनही मला न सांगता बऱ्याच गोष्टी केल्या जाऊ लागल्या. मी करत असलेल्या कामांना दुय्यम ठरवलं जाऊ लागले. मी माझं आवरून मदतीला जाईपर्यंत बऱ्यापैकी कामं करून झालेली असायची. अगदी नाममात्र सहभाग नोंदवला जाईल इतपत कामं मी करायचे. अर्थात कोणीच काही हेतूपुरस्सर हे करत होते असे नाही पण हळूहळू माझ्या मदतीशिवाय काही अडत नाही हे मला जाणवायला लागलं त्याच दरम्यान आम्ही लांब राहायला गेलो. पूर्वी सहजपणे खाली वर करण्याइतके आता येणं शक्य नव्हतं. शिवाय मुलं मोठी झाली व्याप वाढले आणि माझं नसणं कुठेतरी स्विकारलं गेलं. माझी खरंच काही तक्रार नाही काकू पण खरं सांगू का आपल्याला कोणी तरी मिस करतंय ही भावना भेटीची ओढ वाढवते. आपण सगळ्याच जणी आपल्या घरात एकट्याने सगळं करत असतो अगदी सणवार किंवा पै पाहुणा सगळंच पण जेंव्हा एकत्र सणसमारंभ असतात तेंव्हा कुटुंबातील बाहेरून येणाऱ्या सदस्यांची मदत घ्यायची असते ते आपण करू शकत नाही म्हणून नाही तर प्रत्येकाला आपण या कुटुंबाचा भाग आहोत हे जाणवावे म्हणून. काकू सगळं परस्पर झालेलंच असत मग इतक्या लांब येऊन काय उपयोग, जी कामं शिल्लक असतात ती एकतर कोणी करायची हे आधीच ठरलेलं असतं किंवा वेळेवर करण्यासारखी असतात. बरं लवकर येऊनही फारसा फरक पडत नाही. बरं घरच्या सुनेने फक्त जेवायला येणंही मनाला पटत नसत मग इथे येऊन बसलं तरी रिकामं रिकामं वाटतं. सासुबाई आणि काकू तशाही मोठ्या पडतात त्या डोळेझाक करु शकतात माझी मात्र घुसमट होते. तसंही पूर्वीची ओळखीचे लोक सुद्धा आता लांब गेले आहेत त्यामुळे माझ्या ओळखीच्या फार कमी बायका येतात त्यामुळे संध्याकाळी जास्त थांबण्याची गरज वाटत नाही.” भडाभडा बोलून झाल्यावर प्रतिक्षा शांत झाली. पाच मिनिटे शांत झाल्यावर म्हणाली, ” काकू ही माझी तक्रार नाही बरका हे सगळं मी मनोमनी स्विकारले आहे तरीही कधीतरी, तुझ्या मदतीची गरज आहे तू जरा लवकरच ये असं हक्काने बोलावणारं कोणी नाही ही सल मनात आहे. मी मोठी आहे आणि मान म्हणून नाही हां अगदी मनापासून गरज म्हणून नाही तर ओढ वाढावी म्हणून… असो काळाप्रमाणे काही गोष्टी बदलतात घरं लांब गेली तरी मनामनातले अंतर वाढायला नको असे वाटते काकू मुलं एकत्र आली तर प्रेम राहील आधीच त्यांच्या शाळा कॉलेज मुळे एका शहरात राहूनही भेटी होत नाहीत मग पालक म्हणून आपणच त्यांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. काकू मला कायमच असं वाटतं की मुलांनीच एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलं पाहिजे तेही आपणहून परक्या सारखं फोन वरून शुभेच्छा देण्यापेक्षा न बोलावता एकमेकांकडे जाण्याची ओढ त्यांना लागली पाहिजे पण खरं सांगू का हे सगळं फार एकतर्फी व्हायला लागलं आणि मग मी सुद्धा हात आखडता घेतला. मोठी माणसंच जर मनोमनी दुरावली असतील तर हे कठीण आहे. हे माझं वाटणं चुकीचे आहे का?? तुम्ही सांगा काकू? सणवार त्या निमित्ताने केली जाणारी खरेदी, काहीही अगदी घरात लागणारे जिन्नस, सामान, भाजीपाला आणि इतरही बरंच काही जर घरातल्या बायकांनी एकत्र येऊन केली तर आनंद द्विगुणित होईल ना? काही आणायचं आहे का? असं विचारलं तर सगळं आहे हे उत्तर प्रत्येक वेळी मिळत असेल तर पुढच्या वेळी प्रश्न विचारला जात नाही हे सुद्धा जाणवत नाही हो, मग ती येतेच कुठे? आता काय लांब राहायला गेली तर लक्षच घालत नाही वैगरे चर्चांना उधाण येतं आणि माणूस अजूनच दुरावतो. असो !!” येते मी काकू फार उशीर झालाय आभाळ भरून आलेलं आहे पाऊस येण्या आधी निघते, म्हणत स्वतःच्या डोळ्यातला पाऊस लपवत प्रतिक्षा भरकन जिना उतरून गेलीही कदाचित मनातील सल कायम ठेवून…….
सौ. मंजिरी जानोरकर

