कॉलेज मध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या साक्षीचे सगळीकडेच कौतुक होत होतं आणि ते तसं अपेक्षित होतं. कौतुक सोहळे संपले आणि रोजचं आयुष्य सुरु झालं. पुढे शिकण्याआधी थोडा अनुभव घेण्यासाठी काम शोधणं सुरू झालं. इथे मात्र वास्तवाचे चटके बसू लागले. जिथे काम करायला आवडेल म्हणून अर्ज टाकले जात तिथे अनुभवी व्यक्ती हवी होती आणि जिथून कॉल येत होते तिथे अगदीच नगण्य किंवा वेगळ्या कामाची अपेक्षा होती. मुळातच भुणभुणा स्वभाव असणाऱ्या साक्षीला आजपर्यंत सगळं अगदीच सहजपणे नसलं तरी योग्य वेळी आणि न वाट बघता मिळत गेलं होतं. हुशार मुलगी असल्याने तिच्या सगळ्या गोष्टींच प्रत्येक वेळी कौतुक व्हायचे. तिने मागितलेल्या वस्तू तिला देण्यासाठी घरातील सगळे प्रयत्न करायचे त्यामुळे एखाद्या गोष्टी करता नकार तिला फारसा कधी मिळाला नव्हता. किंबहुना ती हुशार आहे म्हणून ती जे मागेल ते तीला एनकेन प्रकारे देण्यासाठी जो तो प्रयत्न करायचा हे करताना तिच्या मागणीचाच फक्त विचार असायचा ती मागणी योग्य आहे का अयोग्य हे फारसे विचारात घेतले गेले नाही. आता नोकरी मिळवताना मात्र घरातलं जग आणि बाहेरचं जग यातला फरक तिला समजू लागला. किमान दोन वर्ष तरी अनुभव घेण्यासाठी तीची चाललेली धडपड एक वर्ष पूर्ण होत आलं तरी संपत नव्हती. आता मुळातला तीचा भुणभुणा स्वभाव उफाळून येऊ लागला, जो आजपर्यंत हुशारी मुळे आणि घरातील लोकांच्या तीला कधीही नाही न म्हणल्या मुळे जाणवला नव्हता. सुरवातीला काही नकार आल्यावर वरवर शांत वाटणारी साक्षी आता आता त्रागा करायला लागली, दिवसेनदिवस तीची चिडचिड आणि अनुषंगाने घरातील वातावरण बिघडू लागले. कायमच कौतुक सोहळे करणारे आईवडील आणि इतर मंडळी आधी समजून सांगण्याचा प्रयत्न आणि नंतर नंतर रागवायला लागले हे साक्षी करता अनपेक्षित होतं. त्याचप्रमाणे ही इतकी हुशार मुलगी अशी का चिडचिड करते आहे हे घरच्यांना अनपेक्षित होतं. तसं पाहिलं तर नोकरी मिळवताना या प्रकारचा अनुभव येणं हे अगदी सहज आहे पण वाट बघण्याची ही प्रक्रिया साक्षी करता नवीन होती. येणारा होकार अथवा नकार हा वैयक्तिक पातळीवर घेतल्यामुळे दु:खावले गेल्यामुळे साक्षी त्रागा करत होती. तिला ही प्रक्रिया पालक म्हणून आईवडिलांनी किंवा घरातल्या कोणीतरी सांगणे आणि ती अनुभवणं हे स्वाभाविक आहे हे कळणे आवश्यक होते.
इथे मुळात शालेय जीवनात किंवा अभ्यासात हुशार असणाऱ्या साक्षीला ती सगळ्याच बाबतीत हुशार असणं गृहीत धरलं गेलं अगदी घरातील लोकांपासून ते आजुबाजुला असणारे आपणही असंच करतो. हुशार मुलगा किंवा मुलगी आपोआपच सतत सगळ्या गोष्टी सहजपणे मिळवते पण वाट बघण्याची सवय, एखाद्या गोष्टीला नकार ऐकण्याची शिकवण आवर्जून दिली गेली पाहिजे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. “कधीच कुठेच चुकीचे न वागणारी मुलं अशी अचानक का चिडचिडी झाली आणि कधीही न रागवणारे पालक मला अचानक इतकं लेक्चर का द्यायला लागले?” असे प्रश्न पडतात पण त्यावर चर्चा होत नाही मग संवाद तुटायला लागतात आणि घडी विस्कटत जाते. हेच सगळं असं वातावरण आणि मूड पुढे carry forward होतो आणि विवाह प्रसंगी तणाव वाढत जातो. मग अपेक्षांच ओझं, मुलामुलींचे विचार, पालकांच्या अपेक्षा, ईगो, योग्य वय आणि वेळ, पगार, नोकरी, स्वतःची प्रायव्हसी इत्यादी इत्यादी हा गुंता सुटत नाही. परिणामी घरातील आणि कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी संबंध बिघडत जातात. साक्षी काय किंवा साक्षात काय, मुलगा किंवा मुलगी त्याने काही फरक पडत नाही. पालक म्हणून मुलांना शाळेत, किंवा कॉलेजचे फक्त शिक्षण देणं, त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणं इतकीच जबाबदारी आता राहीलेली नाही त्या पुढे जाऊन सामाजिक वास्तवाचे भान, नकार, अपयश पचवण्याची तयारी करून घेतली पाहिजे. या करता सतत स्वतःच्या स्ट्रगलच्या कथा मुलांना ऐकवणं किंवा, “आमच्या वेळी असं होतं हे नव्हतं ” असे ऐकवणं योग्य नाही. आजकाल मुलांना ते आवडत नाही, प्रसंगानुरूप एखादा किस्सा गंमत म्हणून जरुर ऐकवा पण सदानकदा लेक्चर आणि स्वतःची शेखी मिरवू नये. याउलट संवाद साधणं, गप्पा मारत एखाद्या विषयावर चर्चा करत काही उदाहरणं देत मुलांच्या कलाने काही गोष्टी पोहोचवाव्या लागतात. आईवडील आणि मुलं यांच्यातला बॉन्ड वयानुरूप प्रगल्भ होत जाणं गरजेचं आहे तो तुटता किंवा सुटता कामा नये.
जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक Process म्हणजे प्रक्रिया असते ती पूर्ण झाल्याशिवाय conclusion म्हणजे उद्दिष्ट साध्य होत नाही. ही प्रक्रिया अनुभवणं हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे ती अनुभवण्याची पध्दत कशी आहे ह्या वर जीवनाचा आनंद अवलंबून आहे, ते enjo करायचं का भुणभुण करत अनुभवायचं हे ज्याचे त्याने ठरवायचे असते आणि हे सर्वस्वी कुटुंबातील सदस्यांचा आदर्श कसा आहे त्यावरून ठरते.
आजची आपली मुलं ही आपलं पर्यायाने देशाचे भवितव्य आहेत. कुटुंब व्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे आणि तो जपणं आपलं कर्तव्य आहे.
सौ. मंजिरी जानोरकर

