नाशिक रथयात्रा एक साठवण

    चैत्र महिना सुरू होतो आणि सुरू होते ‘रामपर्व’. गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसात बऱ्याच ठिकाणी उत्सव साजरा केला जातो, नाशिकचे काळाराम मंदिरात या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नऊ दिवस उपवास, सांस्कृतिक कार्यक्रम, रामायण- महाभारत या विषयावर किर्तनं, प्रवचनं हे राममंदिरात चालू असते. अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालले असते. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला रामयाग असतो आणि एकादशीला रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत दोन रथ आहेत एक गरुड रथ आणि एक रामरथ हे दोन्ही रथ धूरी (जाड कासरा) लाऊन ओढले जातात. परंपरागत रथ ओढण्यासाठी हौशी भक्तमंडळी आणि वंशपरंपरागत अधिकारी तयार होऊन येतात आणि रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. या परंपरेला पेशवेकालीन इतिहास आहे.  अनेक ऐतिहासिक संदर्भ, घटना वयस्कर मंडळी या वेळी सांगतात. ते ऐकून मन भक्तीमय तर होतेच शिवाय हिंदू परंपरांचा अभिमान वाटतो. या अशा सण-उत्सवांचा पारतंत्र्य काळात क्रांतिकारकांनी देशासाठी कसा उपयोग करून घेतला हे ऐकणे प्रेरणादायी असते. आमचा वाडा काळाराम मंदिरालगत आहे आणि मंदिरात जाण्यासाठी एक खास दरवाजा आमच्या घरातून आहे त्यामुळे या उत्सवाचा आपणही एक भाग आहोत असे कायमच वाटत राहते. 

     रामनवमी उत्सवाची सुरुवात झाल्यावर कौसल्या मातेचे डोहाळे जेवण पुजारी मंडळी करतात. त्या वेळी सर्व स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. रामजन्मावेळी पाळणे म्हणतात, गुलालाची उधळण करत राम जन्माचे स्वागत केले जाते. पंजिरी (धने, जिरे,सुंठ, पिठीसाखर, वेलची/जायफळ पूड) प्रसाद म्हणून वाटली जाते. वातावरणातील गर्मीचा प्रभाव या थंड पदार्थांमुळे कमी होतो. उन्हाळा बाधत नाही. अशी पर्यावरण आणि आरोग्य यांची सांगड हिंदू सणउत्वात नेहमीच दिसून येते. दहा दिवस उत्सव झाल्यावर एकादशीला म्हणजेच रथाच्या दिवशी संध्याकाळी मनाला प्रसन्न करणारे आध्यात्मिक वातावरण आणि ढोल ताशा, झांज पथकं, ध्वज नाचवणं, नऊवारी साड्या दागिने घातलेल्या स्त्रिया आणि झब्बा लेंगा घातलेली पुरुष मंडळी असे श्रवणीय आणि रंगीबेरंगी नयनरम्य दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. जय सीता-रामसीता या गर्जनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. संध्याकाळी दोन्ही रथ निघाल्या नंतर रात्री साधारण १०-११ च्या दरम्यान रथ ठरलेल्या रस्त्यावर फिरुन दोन्ही रथ थोड्या थोड्या अंतराने  गोदतीरी पोहचतात. तिथे पुजा होते नंतर त्याच थाटामाटात रथ रात्री उशिरा पुन्हा मंदिरात येतात. तोपर्यंत नाशिककर रथांच्या वाटेवर रांगोळी काढत, सजावट करत रात्र जागवतात. मंदिरात रथयात्रेची सांगता होते आणि प्रत्येक जण पुढच्या वर्षीचे नियोजन करत घराकडे परततो.

   

                                   सौ.मंजिरी जानोरकर.