“गुंतता हृदय हे”

       ” या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या….”

     माणसाचं हृदय हि फार विलक्षण गोष्ट आहे. गुंतागुतीचे तर आहेच परंतु मेंदुशी निगडीत आहे.असे म्हणले तर वावगं ठरणार नाही. कारण मेंदू मध्ये होणाऱ्या भावनीक हिंदोळ्यांचे थेट परिणाम हृदयावर होतात. बरं हे हृदय म्हणजेच सामान्य लोकांसाठी ‘मन’, कुठे, कधी आणि कसे गुंतेल हे ठरवता येत नाही.  आपल्या हातात नसतानाही मग आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात.

    पालकांचे मन आपल्या पाल्यांमध्ये नेहमीच जरा जास्त गुंतत असते.  एकदा पति-पत्नी माता पिता झाले की मग त्यांच्यातले मी पण संपते आणि फक्त आई-बाबा पण उरते. मुलांच्या भोवती त्यांचे विश्व फिरत राहते. त्यांचे संगोपन,पालन-पोषण आणि शिक्षण हेच ध्येय बनुन जाते. मुलं लहान असतात तोपर्यंत ती सुध्दा हा आनंद, प्रेम घेत मोठे होण्याचे भाग्य मिरवत असतात. 

मुलं मोठी होतात पण पालक मात्र मोठेच होत नाहीत.  मुलं लांब जायला लागतात त्यांचे विश्व विस्तारायला लागते, मग मुलं दुरावली जात आहेत असं वाटून, आपण संस्कार करण्यात कमी पडलो असा स्वतः ला दोष देत राहतात.  मुलांमध्ये गुंतणं आणि त्यांच्या बरोबर मोठं होणं हे जमलं पाहिजे. त्यांचं आपल्या पासून लांब जाणं हे दुरावणं नसून स्वतः ला सिद्ध करणं आहे.  मोठ्या झाडांच्या फांद्यांची सावली लहान झाडांना वाढू देत नाही. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र रोपण आवश्यक आहे. हे पालकांनी जागरूक राहून समजू घेणं गरजेचं आहे. पालकांची मानसिकता ‘कळतं पण वळत नाही,’ अशी असते. 

हृदयाचं हे आशा प्रकारचं  गुंतणं क्लेशकारक असतं.

शिक्षणासाठी गेलेली मुले जेंव्हा तिकडेच राहण्याचा निर्णय घेतात तेंव्हा आणि सासरी गेलेली मुलगी,”आई-बाबा आज मला नाही येता येणार.”असं म्हणते, त्यावेळी मनाची होणारी तगमग आनंद अन् दु:ख ह्या दोलायमान स्थितीत होत असते. नाइलाजाने मग हिरमुसले होऊन उगाचंच हे  आई-बाबा पूर्वीचे पति-पत्नी होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत एकमेकांना समजवत राहातात.   मन मात्र  म्हणत असते,” या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या…”

  

    पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा 🙏🏻👍🏻.  

                               सौ.मंजिरी जानोरकर