पदर

       “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा,

         आई मला नेसवं शालू नवा…”

    ‘स्त्री’ ची एकाच जन्मात अनेक रूपं दिसतात.  नवरात्रिच्या नवदुर्गां प्रमाणे ती अनेक रूपं घेत असते. तसे तर पुरुष सुद्धा वेगवेगळी नाती निभावतो पण स्त्री अनेक भूमिका निभावत असते. तिच्या प्रत्येक भूमिकेला अनेक पदर असतात. एकाचवेळी ती खूप काही असते मुलगी, बहीण,नात,नणंद, वहिनी,जाऊ,आई,आजी पत्नी आणि मैत्रिण. सगळ्या नात्यांत निरनिरळी जबाबदारी असते अनेक हळवे पैलू असतात. अनेक पदर असुनही त्यांचा गुंता ती होऊ देत नाही. 

        गोंडस चिमण्या पावलांनी चिमणी घरात येते आणि घर हसरं होतं. तिचं लडिवाळ बोलणं, घुंगरू असलेले पैंजण घालून घरभर फिरणं सगळेचजण enjoy करतात. आई सारखे दिसावं म्हणून तिची नक्कल, आजीला खूष करायला तिच्या मागेपुढे करणं,बाबांची तर ती जीव की प्राण असते. मुलगी मोठी लवकर होते असं म्हणतात ते काही खोटे नाही. जबाबदारी फार लवकर कळते मुलींना. निरागस मोकळेपणानं वागण्यावर मग बंधनं येतात. वयात येताना होणारे तिच्यातले बदल आई, आजीला हळवं करतात. दोघीजणी तिच्यांत आपलं बालपण शोधत मनातल्या मनात ते पुन्हा ‘ती’ च्या रुपांत पाहात असतात. 

        मोठ्ठी झालेली चिमणी सगळ्यांची आई होते. आईला तर प्रत्येक ठिकाणी ती लागतेच. कुठेही जाताना, खरेदी करताना अगदी कामाच्या वेळीही तिला हाका मारल्या शिवाय काही होत नाही. दिवस भुर्रकन उडून जातात आणि एकदिवस चिमणी कोणाचीतरी पत्नी,सून,नणंद होते. बालपण सरतं जबाबदारी वाढते. तिच्या घरात ती लक्ष्मी असते. आईच्या एका डोळ्यांत आसु अन् एका डोळ्यांत हसु अशी अवस्था असते. लेकीला सासरी पाठवून ती पुन्हा एकदा भूतकाळात शिरते. तिचं स्वतःचं तिच्या घरात येणं,रुळणं, हळूहळू नव्या घराशी एकरुप होणं. चिमणीचं येण ते सासरी जाईपर्यंत सगळं ती पुन्हा पुन्हा आठवतं रहाते. आतापर्यंतच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत ती स्वतःला त्रयस्थपणे पाहात उजळणी करते. 

     इकडे नव्या सुनेची नवलाई असते. घरातील आई सासू झाली असते. सून म्हणून तिची जबाबदारी संपूर्णपणे स्विकारून ती आता नव्या रूपात शिरते.  नवीन आलेल्या सुनेचं स्वागत करताना मनात ती स्वतःला बघत असते. आठवत असते. आपल्या सासुबाईंच्या  अनुभवातून कसं वागायचं काय टाळायचं ह्याची तिची उजळणी चालू असते. 

      स्त्रियांच्या नात्यांमध्ये हीच गंमत आहे. तिचं ज्यांच्याशी अजिबात पटंत नसतं त्यांच्याच वाचून तिला करमत नसतं. एकमेकींच्या असण्यानसण्याचा परिणाम त्यांच्या वर होतं असतो. कोणालाही स्त्री कितीही complicated वाटत असली तरी स्त्री म्हणजे घर. स्त्री मनाचे हळवे पदर म्हणजेच भावना, प्रेम, वात्सल्य. आईच्या,आजीच्या  ठेवणीतल्या पैठण्या, शालू ह्यांचा स्पर्श अशा अनेक आठवणींचा खजिना असतो म्हणूनच साडी हा भारतीय स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. साडी कितीही जुनी झाली तरी तिचीच गोधडी उबदार वाटत असते अगदी प्रत्येकालाच आणि म्हणूनच आता तर गोधडी  सुद्धा ग्लोबल झाली आहे, बायकांसारखीच अगदी नवीन रूपांत. 

पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.

                                  सौ.मंजिरी जानोरकर.