श्रीरंग

        “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवाा,

           तुझ्या सारखा तूच देवा, 

               तुला कुणाचा नाही हेवा..”

      कृष्ण जन्माष्टमी हा एक उत्सह, आनंद वाढवणारा सण आहे. कंसा सारख्या अत्याचारी राज्यकर्त्याचे निर्दालन करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला. संपूर्ण राज्यात एक प्रकारची मरगळ आलेली होती. आपल्याच गायींच्या दुधा-तुपावर आपलाच हक्क नसावा हा अन्याय आहे. ह्याची जाणीव सुद्धा प्रजेला उरली नव्हती. इतक्या जाणीवा हरवणं ही गंभीर गोष्ट होती. हसत खेळत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी करता येते हेच श्रीकृष्णाने आपल्या लीलांमधून दाखवून दिले आणि कंसाला मारून सिद्ध केले. कंसाला मारून हा थांबला नाही तर अर्थकारण, राजकारण, समाजकारण ह्या सगळ्यांचेच धडे घालून दिले. पण म्हणून कृष्णाचे कोणतेही रूप आठवताना तो गंभीर, प्रौढी असा डोळ्यासमोर येत नाही. उलट अल्लड,अवखळ,नटखट कान्हा हिच त्याची प्रतिमा सर्वांच्याच मनात असते. कृष्णाच्या प्रत्येक लीलेत आनंद ओसंडून वाहताना दिसते. 

       गंमत म्हणजे अशा अवलिया कृष्णाचा जन्म चक्क तुरुंगात झाला होता आणि जन्मतःच आई पासून ताटातूट झाली होती. तरीही फक्त आणि फक्त आनंद वाटण्याचे काम त्याने केले. दैवी अवतार समजून अनेक अमानवी शत्रू आणि भयानक हल्ले नकळत्या वयात त्याने परतवले. कळत्या वयाचा होईपर्यंत अनुभवातून आणि संकटांमधून सुद्धा  कृष्ण घडला आणि तो श्रीकृष्ण झाला. मानवी मर्यादा त्याला म्हणूनच कधी थोपवू शकल्या नाहीत. प्रसंगी दैवी चमत्कार करून त्याने स्वतःचे कृष्णत्व  सिद्ध केले. प्रजेला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि आनंदाचा ठेवा पुन्हा परत समाजात उधळण्यासाठीच दहिहंडी, होळी साजरी करत गोपगोपीकांमध्ये रमला. 

        अन्यायाला वाचा फोडण्याकरता पार्थाला युद्धाचे धडे देणारा, त्याचा सारथी सुद्धा बनणारा कृष्ण सामान्यांसाठी परमेश्वर आहे आणि त्याच्या सहस्र नामांपैकी एक नाव ‘आनंद’आहे तो मिळवणं कृष्ण प्राप्ती सारखेच आहे.

  

पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा.

                            सौ.मंजिरी जानोरकर.