श्रद्धा, गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुलगी झाली म्हणून हे नाव ठेवले आई-बाबांनी. श्रद्धाला मात्र खूप राग यायचा जुन्या पद्धतीच्या या नावाचा. तसंही १२-१३ वर्ष वयाच्या मुलीला हे नाव न आवडणं स्वाभाविक होते, त्यातून आज तिच्या मैत्रिणींनी तीला,” किती कठीण नाव आहे गं तुझं” असं म्हणल्या मुळे ती जास्त नाराज होती. इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत असलेल्या ते Name meening less आणि कठीण वाटणंही बरोबरच होतं. रागावून जाऊन रूममध्ये बसलेल्या श्रद्धाला जेवायला बोलवायला तिची आजी आत आली. ती आत आली ते गाणं गुणगुणतच ,” इतनी शक्ती हमें दे ना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना|”
आजीला श्रद्धाचा मूड कळायचा. बऱ्याच गोष्टी न सांगता आजी ओळखत असे. का नाही कळणार आई पेक्षा जास्त ती आजीच्या सोबत असायची त्यामुळे विचारांनी प्रगल्भ आणि समजुतदार सुद्धा होती श्रद्धा. तीला जवळ घेत आजी शांतपणे तीला सांगु लागली,
“श्रद्धा” हा शब्द भक्तीशी जोडला जात असला तरी त्याचा अर्थ व्यापक आहे. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं म्हणजे त्याच्यावर विश्वास असणं, ती गोष्ट मनापासून अंगिकारणं. नुसत्या स्विकारण्यात तडजोड असते. अंगिकार हा मानसिक आणि भावनिक दृष्ट्या स्विकारलेला असतो. श्रद्धा ही देवांवर, धर्मावर, देशावर अगदी आपल्या आईवडिलांवर, गूरूंवर असू शकते. एखादी व्यक्ती कामावर सुद्धा श्रद्धा ठेवू शकते. श्रद्धा ही व्यक्ती सापेक्ष आहे. श्रद्धा ऊर्जा देते. भाविक म्हणजेच श्रद्धाळू असं समीकरण जोडलं जातं, बऱ्याच अंशी त्यात तथ्य आहे सुद्धा. भावनांना,श्रद्धेची जोड मिळाली तर अधिक सकारात्मक अनुभव येतात. “
” प्रत्येक माणूस कितीही प्रॅक्टिकल असला तरी कोणत्या ना कोणत्या गोष्टी पुढे शरणं जातंच असतो. आपल्या सिनीअर्सना, अथवा एनतेन प्रकारे ज्यांच्या मुळे कामं होतील अशी कोणतीही व्यक्ती किंवा एखादं ठीकाण अगदी काहीही, माणूस तिथे शब्दशः नतमस्तक होत नसेल कदाचित पण मनातून आदर नक्कीच करतो त्याला मान देत असतो. हीच गोष्ट सकारात्मक प्रभाव वाढवते. काम करण्याची उमेद देते. आयुष्यात उमेद, प्रोत्साहन मिळणे हाच आशिर्वाद आहे आणि श्रद्धेचा परिणाम सुद्धा. गरजेच्या वेळी आवश्यक असलेली गोष्ट वेळेत मिळणं हे श्रद्धेचे फलित आहे, विश्वास हा गाभा आहे. कुठल्याही बाबतीत विश्वास असणं ही गुरुकिल्ली आहे. औषध घेताना डॉक्टरांवर विश्वास, शाळेत शिक्षकांवर, ह्या विश्वासातच श्रद्धा लपलेली आहे ती मान्य असो वा नसो ती असतेच कारण विश्वास हेच माणसाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.”
भावनांच्या भरात आणि बोलण्याच्या ओघात आजी खूप अवघड अवघड असंच सगळं सांगून थांबली मग तीला त्यातला फोलपणा जाणवला की हे सगळं चिमुरडीच्या डोक्यावरून गेले असणार. तिची चिमणी तोंडाचा आ वासून आजी कडे बघत बसली होती. आजी बोलायची थांबली तेंव्हा श्रद्धा म्हणते कशी, “आजी तू काय सांगितलं ते थोडं थोडं समजलं, पण एक मात्र नक्की कळलं की हे माझं Name special आहे and meening full सुद्धा आहे. माझ्या फ्रेंड म्हणतात तसं hard असलं तरी काहीतरी भारी आहे now I will tell them that my name is very special, my grandmother told me the meening and so I love my name. आजीच्या या बोलण्याने श्रद्धाची तिच्या नावावर ची श्रद्धा सहजच दृढ झाली.
सौ.मंजिरी जानोरकर.

