“काही बोलायाचे आहे
पण बोलणार नाही…”
बोलणं हे संवाद साधण्याचे माध्यम आहे. लिहून किंवा वाचून सुद्धा तो साधता येतो पण बोलणं हे जास्त प्रभावी आहे. सभोवताली अनेक प्रकारचे लोक असतात, खूप बडबडे, कमी बोलणारे, मोजक्या शब्दात आपलं मत मांडणारे. अशी बरीच लोकं असतात. गप्पीष्ट,मुखदुर्बल अशी अनेक विशेषणं लावता येतील. मुद्दा असा आहे की संभाषण किंवा संवाद हा रोजच होत असतो प्रत्येक वेळी ठराविक विषयावर किंवा काही कारण असेल तरच आपण बोलतो असं होतं नाही. कुटुंबातील सदस्य असतील किंवा अगदी रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारणारे ग्रुप असतील बोलल्या शिवाय माणूस राहू शकत नाही. यातूनच थट्टामस्करी, हास्यविनोद घडतात, विनोद निर्मिती होते. मनोरंजन होते आणि मन मोकळे होते. थोडक्यात सांगायचे तर संभाषण कला किंवा भाषा नसती तर कठीण होतं.
बोलण्याचे काही अलिखित संकेत असतात. कुठे, कसं, काय आणि किती बोलायचं हे संकेत. रोजच्या जीवनात ते आपण आपोआप शिकत जातो त्याचा वेगळा असा अभ्यास नसतो.अनुभवातून, परिस्थिती पाहून ते जमतं. बरेचदा चेष्टा करण्याच्या हेतूने काही बोललं जातं आणि हसून टाळलं सुद्धा जातं. सगळ्यांनाच योग्य चेष्टा करता येते आणि चेष्टा करण्याची योग्य वेळ कळते असं होत नाही बहुतेक जणांचं टायमींग ह्या बाबतीत चुकतं आणि गैरसमज होतात. म्हणूनच या गोष्टींचं भान असणं गरजेचं आहे. एखाद्याला चेष्टाच सहन होत नाही किंवा एखाद्या गोष्टीची चेष्टा केलेली चालत नाही, हे समजून गंमत केली तरच वातावरण हलकंफुलकं ह़ोईल नाही तर बिघडेल. विनोदी लेखन करणारे आणि विनोदी कलाकार ह्यांचं यश यावरूनच ठरतं.
मार्मिक विनोद हा म्हणूनच कठीण आहे. समोरच्या माणसाला न दुखवता हलकेच चिमटा काढणं आणि हास्य फुलवणं वाटते तितके सोपे नाही. तसं झालं नाही तर संवाद संपुष्टात येऊन वाद सुरू होतात आणि नातेसंबंध धोक्यात येण्याची शक्यता वाढते. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे स्वभाव, त्यांचे विकनेस, strong points हे माहीत असणं अपेक्षित आहे मगच त्या व्यक्तीच्या वर्मावर बोट न ठेवता गंमत करणं शक्य होईल.
म्हणायला साधीशी गंमत पण ती करताना सुद्धा विचार करावा लागतोच. नाही तरी बोलतानाही विचार करून बोलावं हेच खरं नाही तर सगळ्यांचीच अवस्था, “काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही..” अशी होईल.
सौ. मंजिरी जानोरकर

