उजाळा

  अभि आर्किटेक्ट झाला. याचं सगळ्या वाड्याला कौतुक वाटलं. अभि म्हणजे अभिजित केळकर, वाड्याचे मालक वामनराव केळकरांचा मुलगा. वामनराव स्वतः इंजिनिअर आणि आता मुलगा आर्किटेक्ट म्हणजे दुधात साखर. आता नक्की वाडा जाणार आणि टॉवर होणार अशी कुजबूज सुरू झाली होती. हो कुजबूजच कारण माई असे पर्यंत वाडा पडेलच अशी खात्री नव्हती. माई म्हणजे अभिची आजी. मुलगा इंजिनिअर झाला तरी त्यांनी वाड्याला धक्का लागू दिला नव्हता पण आता नातवापुढे कितपत त्या ठामपणे राहू शकतील?? असे सगळ्या भाडेकरूंना वाटत होते आणि ते चुकीचेही नव्हते. तसा वाडा भक्कम वैगेरे अवस्थेत नव्हता पण फार मोडकळीस आला नव्हता.  काळानुरूप बदल न झाल्याने गैरसोयी मात्र भरपूर होत्या.                                                       अभि आर्किटेक्ट झाला याचा अभिमान माईंना होता आणि भीती सुद्धा होती आता वाड्याचे, मुख्य म्हणजे भाडेकरूंचे भवितव्य काय?? वाडा थकला असला तरी नाती थकली नव्हती. गैरसोय असुनही भाडेकरू वाडा सोडून गेले नाही ते केवळ नवीन फ्लॅट मिळेल किंवा त्या बदल्यात जागा मिळेल म्हणून नाही उलट,” माई! तुम्ही काळजी करू नका अभिने कधीही घर खाली करायला सांगितले की आम्ही लगेच बाहेर पडू. आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही, आधीच  खूप दिलं आहे तुम्ही आणि नानांनी. आमचीही घरांची सोय झाली आहे पण आम्हाला वाडा असे पर्यंत राहायचं आहे, बस जेवढा मिळेल तेवढा सहवास भरून घ्यायचा इतकाच स्वार्थ आहे.” असं सगळेचजण म्हणत होते. त्यामुळे त्या  बाजूने तशी काळजी नव्हती आणि माई सुद्धा तशा फार बुरसटलेल्या विचारांच्या नव्हत्याच पण इतके वर्षांचा सहवास म्हणून जरा हळव्या झाल्या होत्या. या वेळी अभिने विचारलं तर परवानगी देऊन टाकायची असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं.  

    आणि तो दिवस आला. अभि आजीच्या खोलीत येऊन बसला. त्याची चुळबुळ सुरु होती, तसा तो नेहमीच त्या खोलीत येऊन आजीची चेष्टा मस्करी करायचा पण त्याचं आजचं येणं अस्वस्थ असणं यावरून आजीनं काय ते ताडलं. त्याचे हात हातात घेत आजीनच विषय काढला, “बोल बाळा वाड्याविषयी बोलायला आलास ना बोल. मी नाही त्रागा करणार.”  आजीचं बोलणं ऐकून तिच्या स्वरातील तिची निराशा त्याला जाणवली. तिने धरलेले हात हलकेच दाबत तो म्हणाला, ” आज्जी वाड्या बद्दल असलेल्या तुझ्या भावनांचा मला अभिमान आणि आदर आहे. मी इथे काहीतरी नवीन करणार आहे हे निश्चित पण तुमच्या सगळ्यांच्या भावना जपून. हे बघ मी ह्या क्षेत्रात नवीन आहे, बांबाना लोक ओळखतात यामुळे मला कामं मिळतील सुद्धा पण मला माझी ओळख निर्माण करायची आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, आणि हा वाडा डेव्हलप करणं हे माझं भांडवल आहे  शिवाय तुझा आणि आजोबांचा आशिर्वाद आहे. त्यामुळे मी तुमच्या भावनांचा खेळ करणार नाही. तू आधी माझा नवा प्लॅन बघ तुला जर तो आवडला तरच मी पुढे जाईन पण काही न बघताच निर्णय घेऊ नकोस अगदी कुठलाही. ”  हे ऐकून आजीला अभिचा अधिकच अभिमान वाटला. तिच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. बरं तर मग दाखव तयार झाला की. असं आजीने म्हणायचाच अवकाश अभिने आधीच करून आणलेला प्लॅन मागून पुढे घेतला. आजी यावर गोड हसली सगळं तयारच आहे तर.  अभिने प्लॅन उघडला त्यावर आडव्या उभ्या रेषा होत्या आता आजी समोर चित्र स्पष्ट व्हावे यासाठी त्याने लॅपटॉप  उघडला आणि रंगीत चित्रे दिसू लागली. हे रे काय! हा तर जुनाच वाडा दिसतो आहे पुन्हा पाडून तेच बांधणार का? आजीच्या या प्रश्नावर हसत अभिने मूळ रचनेत बदल न करता नवीन सोयी कशा add  केल्या आहेत आणि  त्यातच जुन्या भाडेकरुंना मोठी आणि आधीपेक्षा सोयी सुविधा उपलब्ध करून त्या शिवाय काही नवीन कमर्शियल बदल कसे केले आहेत, जुन्या नव्याचा संगम साधला आहे हे दाखवले. आजी शांतपणे बघते आहे पण काही बोलत नाही म्हणून त्याने मान वर करून पाहिलं तर आजीच्या डोळ्यात गंगा यमुना होत्या. “डोळे पुसत तिनं विचारलं म्हणजे तू जुनं काही बदलणार नाहीस? ” “नाही कसं, हे नवीन गाळे, नवीन लोकांना राहता येईल असे दोन बेडरूम ची घरं हे वाढीव आहे शिवाय नवीन एफएसआय प्रमाणे काही जाग मोकळी ठेवावी लागते ते पण आहे.” “ते त्यातलं मला काही कळत नाही तू जुनं जपलं आहे यातच मला आनंद झाला.” असं म्हणून आजी म्हणाली म्हणजे तू या घराला उजाळा देणार आहेस रे राजा, दे हो दे तो गरजेचाच असतो. आपण नाही का सणावारी, लग्न कार्य ठरले की देव आणि देवघराला उजाळा देतो. तसा मधून मधून नात्यांना आणि काही काळानं जुन्या घराला सुद्धा उजाळा देणं चांगलंच असतं. छान छान आहे हो हे आवडलं मला.”  आजीनं मन भरून परवानगी दिली आणि नातवाला प्रेमानं जवळ घेतले.  

      हे दृश्य वरून नाना आणि दाराआडून वामनराव हे नव्याने उजळलेलं नातं समाधानाने पाहात होते.

                            सौ. मंजिरी जानोरकर