” कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे..”
एखादी व्यक्ती आपली म्हणतो तेव्हा ती आपल्या चांगल्या परिचयाची आहे इतकंच खरं असतं कारण मुळात माणूस हा समाजप्रिय, तो समाजात राहून आसपासच्या लोकांना जाणून घेण्याचा, त्यांच्या सोबत राहाण्याचा आग्रह धरत असतो कारण ओळखीच्या लोकांमध्ये सुरक्षित वाटत असते. माणूस ओळखीचे असणे आणि माणसाला ओळखणे ह्यात बराच फरक आहे. बरेचदा पालक मुलांना माणूस ओळखून राहा असा सल्ला देतात. आपल्या समाजात चांगली – वाईट सगळ्या प्रकारची लोकं असतात. सर्वसाधारणपणे एका भेटीत हे समजणं कठीण असतं पण हळूहळू एखाद्या व्यक्तीला किती जवळ येऊ द्यायचे, कोणाला लांब ठेवायचे ते लक्षात येते आणि आपण तसे जुळवून घेतोही. हे झाले आसपासच्या लोकांबरोबर पण..
अनेकदा अनेक वर्षे एकत्र घालवून सुद्धा माणसं एकमेकांना पूर्णपणे ओळखत नाहीत हे सत्य आहे. एकमेकांशी जुळवून घेणे, संबंध चांगले असणे, स्वभावाची माहिती असणे हा वेगळा मुद्दा आहे. प्रत्येक माणूस हा एक पुस्तका सारखा असतो आणि प्रत्येक पानांवरील संदर्भ सतत बदलत असतात. त्यामुळेच अनेकदा, अनेक वर्षे ओळखत असुनही आपलं माणूस आपल्याला अनोळखीच असते. अगदी आपलाच मुलगा, मुलगी बरेचदा खूप अनपेक्षित वागतात अर्थात प्रत्येक वेळी ते चुकीच्या अर्थाने नसते, कठीण काळात लहान वाटणारी मुलं खूप जबाबदारीने वागतात. त्यांचे ते रूप अनोळखी असतं. आपलीच आई किंवा वडील काही वेळा कसे रिॲक्ट होतील हे आपणच सांगू शकत नाही. पतिपत्नींच्या बाबतीत तर हा अनुभव अगदी रोजचाच असतो, असं म्हणलं तरीही अतिशयोक्ती होणार नाही. चाळीस चाळीस वर्ष संसार करून सुद्धा ती दोघं बऱ्याच गोष्टींत एकमेकांना पूर्ण ओळखतातच असं होत नाही. अगदी यशस्वी आणि प्रेमानं संसार केला असला तरीही. कारण ‘मन’ हे फार गूढ आहे ते स्वतःचा थांग अगदी स्वतःला सुद्धा लागू देत नाही. जाणीवपूर्वक चांगले-वाईट प्रसंग, आठवणी, वस्तू यांसारख्या अनेक गोष्टी त्यांनी एकमेकांपासून लपवलेल्या असतात. बरेचदा त्या वेळेची गरज म्हणून किंवा त्यांच्याच भल्यासाठी म्हणून असेल. कारणं काहीही असोत पण म्हणूनच सगळेच एकमेकांना अनोळखी असतात हे नक्की. हे चुकीचे किंवा बरोबर याही पेक्षा ते सत्य आहे आणि ते स्विकारणे योग्य. कारण कोणीही कितीही खरं प्रेम करतं असलं तरीही अंतर्मनाचा ठाव घेणं अशक्य आहे.
आई-वडील, पतिपत्नी, मुलं, मित्र, आप्त स्वकीय ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात. गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी असतात आणि तेच “प्रेम” असते जे आश्वासक असते ते आपल्याला स्पर्शातून, शब्दातून मिळत आणि कळत असते जे आपल्या ओळखीचे असते.
सौ.मंजिरी जानोरकर.

