उपरती

      माधवचं वय तसं फार नव्हतं.  पन्नाशी अजून गाठली नव्हती तरीही गुडघेदुखीने हैराण झालेला होता. बरेच उपाय केले होते आणि चालूही होते. कधी फरक पडे तर कधी येरे माझ्या मागल्या.  दोन तीन वर्षांपासून हे सुरू होतं. Knee  transplant चे ऑपरेशन करून घेणं हा शेवटचा उपाय आहे आणि एवढ्या लहान वयात नको म्हणून बाकीच्या गोष्टी करणं सुरू होतं. माधवी म्हणजे माधव ची पत्नी मात्र या सगळ्याला चांगलीच कंटाळली होती पण असं म्हणणं किंवा दाखवणं हे माधवला कायमचं दुखावण्यासारखं होतं. हे तिला कळत होतं आणि म्हणून ती जमेल तेवढे सहन करत होती. ती मुळात माधवच्या दुखण्याला नाही तर त्याच्या वागण्याला कंटाळली होती. त्याचं औषधपाणी आणि बाकीचे वेळापत्रक ती शक्य तितक्या efficiently  करत होती. तीचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं आणि त्याचंही तिच्यावर तितकंच प्रेम होतं. खरंतर हे दुखणं सुरू झालं आणि माधवचा स्वभावच बदलला. सतत त्रासलेला, पटकन चिडणारा आणि मुख्य म्हणजे माधवी मनापासून सगळं करत आहे याकडे सरळ सरळ डोळेझाक करणारा, तो! तीला अगदी गृहीत धरून वागत होता, आणि याचाच सगळ्यात जास्त त्रास तिला होतं होता. बरं या विषयावर काही बोलण्याचा प्रयत्न जरी तिने केला तरी अर्थाचा अनर्थ करून तिलाच दुषणे द्यायचा.  पुन्हा,” मी किती सहनशील आहे मी त्रागा करत नाही आणि काही त्रासही देत नाही तुम्हाला.” अशी शेखी मिरवायचा. घरातील मंडळी, ” तो आजारी आहे तूच समजून घे.” असं समजवायची.  माधवचा व्यवसाय असल्याने मोबाईल वरून तो ते सगळं हॅण्डल करायचा त्यामुळे गुडघेदुखी असुनही मी आर्थिक बाजू समर्थपणे सांभाळत आहे याची जाणीव वागण्यातून आणि कधीतरी बोलून करून द्यायचा.  बरं सतत भेटायला येणारी मंडळी चालूच होती, त्यांनाही चहापाणी, नाष्टा करवून घ्यायचा. या सगळ्यात मुलं लहान म्हणून आणि बाकीचे सगळे असून नसल्यासारखे म्हणून धावपळ तीची एकटीच व्हायची. माधव कधीच तिला अप्रिशिएट करत नसे उलट काय राहिलं, चुकलं हेच ऐकवत राही.  या सगळ्याचा परिणाम माधवीच्या तना-मनावर होतोय याची साधी जाणीव सुद्धा त्याला नव्हती तो फक्त त्याच्या दुखण्यात मग्न होता आणि सगळ्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक होते.  माधवी कडे कोणाचेच लक्ष नव्हते अगदी तिच्या माहेरच्या लोकांचेही. हक्काने तिने फोनवरून काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिला उपदेशाचे डोस मिळत होते.           ऑपरेशन  करून फायनली माधवला रिलीफ मिळाला. देवाच्या कृपेने सगळं सुरळीत सुरू झालं खरं पण माधवीची धावपळ अधिकच वाढली, येणारे लोक आणि काही दिवस माधवचं सगळंच यात ती पुर्ण दिवस दमत होती. या परिस्थितीत चिडून कुठेही निघून जाण्याचा विचार सुद्धा तिच्या मनात येत नव्हता. एकटी बसून बरेचदा ती रडून मन मोकळं करायची पण प्रेमाने जवळ घेऊन तिचे डोळे पुसायला सगळे असून कोणी नव्हतं.                                                         वर्षभरात  माधव पूर्ण बरा झाला आणि त्याचं रुटीन नियमित सुरू झालं पण त्या दिवसांबद्दल त्याने तिच्या जवळ कधी एक अवाक्षरही काढले नाही. दिवाळीच्या दिवशी मात्र कहर झाला. माधवीच्या  काहीतरी बोलण्याचा नेहमी प्रमाणे चुकीचा अर्थ काढून माधव तिला जिव्हारी लागेल असं काही बोलला आणि तिचा बांध फुटला. सरळ बॅग उचलून काहीही न बोलता ती घरातून बाहेर पडली अगदी मुलं, फोन सगळं सोडून.  संध्याकाळी ती येईल एवढं काय झाले आहे. असा विचार करून माधव वाट पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती. हे निमित्त साधून त्याने ती कोणाकडे गेली आहे का याचा अंदाज घ्यायला फोन केले पण ती कुठेच नाही म्हणाल्यावर तो मनापासून हादरला. भाऊबीज होती म्हणून त्याची आई बहीण आणि इतर मंडळी घरी जमली आणि माधवी कुठे गेली, कधी येणार अशी विचारणा सुरू झाली. आता मात्र कालपासून घरात नसलेल्या माधवीची उणीव घर भरलेलं असुनही त्याला झाली. सतत चिडचिड करणारी आणि दिवसभर फक्त घरासाठी धडपडणारी एरवी  irritated  वाटणारी पत्नी त्याला अचानक समोर हवीशी वाटायला लागली. त्याचं सैरभैर होणं त्याच्या बहीणीपासून लपलं नाही. तिनं विचारताच त्याचा बांध फुटला आणि काय झालं ते त्याने सांगितले. त्याला शांत करत अनुराधाने म्हणजेच बहिणीने त्याला त्याच्या बेजबाबदार वागणुकीची जाणीव करून दिली. तिला समजून घेण्यात तो कमी पडतो आहे हे लक्षात आणून दिले. तिचाही मेनोपोझ सुरू होतं आहे आणि आता सगळ्यात जास्त तिला तुझी गरज आहे. तिने तीची जबाबदारी न टाळता निभावली आता तुझी टर्न आहे. असंही बजावलं.   हे सगळं ऐकल्यावर माधव म्हणाला,” हो अनू मला जाणीव नाही असं समजू नकोस ती आहे म्हणून मी तिला दिवाळीला पैठणी घेतली आणि नेकलेस सुद्धा केला.”  हा दिखावा झाला माधवा, आई मध्ये पडली स्त्रीला साड्या, दागिने यांची हौस असते म्हणून प्रत्येक वेळी फक्त तेवढं पुरेसं नसतं. तुझ्या वागण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून तूझं प्रेम आणि मुख्य म्हणजे कृतज्ञता  दिसली पाहिजे अगदी ती तुझी पत्नी असली तरी. आपलं माणूस असलं तरी सगळ्यांना स्वाभिमान असतोच असतो, कौतुकाची थाप आणि तीही आपल्या माणसांकडून जास्त गरजेची असते हे लक्षात ठेव.                                       हे सगळं खरं तर माधवला आधीच कळायला हवं होतं, पण बरेचदा ते कळून सुद्धा वळत नाही पण दुर्दैवाने अनुराधा सारख्या बहिणी आणि  अशी सासू सगळ्या घरात नसतात. माधवला त्याची चूक समजली की नाही माहीत नाही पण सगळ्यांनाच ही उपरती करून देणं अत्यंत आवश्यक आहे.  नाहीतर कुटुंब तुटणार नाही कदाचित पण मनं मात्र कायमचीच दुरावतील.

                             सौ. मंजिरी जानोरकर.