देवभोळी

      शांता एका मध्यम वर्गीय कुटुंबातील स्त्री. लहानपणापासून घरांत संस्कारांचा पगडा होता. चांगले -वाईट, पापपुण्य या संकल्पना मनावर बिंबवल्या गेल्या होत्या. त्यामुळे असेल कदाचित पण कोणतीही गोष्ट करताना, हे बरोबर आहे का नाही, चांगले असेल ना, काही चुकीचे तर नसेल ना?? इत्यादी गोष्टींचा विचार करून ती सगळं करत असे. यामुळे काही बिघडत होतं असं नाही पण नवीन पिढी तीची खिल्ली उडवायला लागली होती. थोडा त्रागा करत होती. हे जाणवत असुनही इतक्या वर्षांनी बदलणं जरा कठीणच होते.        या सगळ्या मुळे शांता आता जरा एकटी पडत होती. बरेचदा तिला न विचारता काही गोष्टी ठरवल्या जाऊ लागल्या होत्या. तिच्यावर रागावून किंवा प्रेम नाही म्हणून नाही तर तिच्या शंकेखोर पणाला टाळण्यासाठी. 

         शांताच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदात,मजेत होता पण शांताला या सगळ्या गोष्टींची अनामिक भीती वाटत होती. सगळेजण परस्पर निर्णय घेताहेत, चांगले -वाईट, काळवेळ यांचं भान ठेवत नाही, घरातील मोठ्या माणसांना विचारणं नाही. असे एक ना अनेक प्रश्न, शंका मनात आणून ती सतत चिंता ग्रस्त राहू लागली आणि कळतनकळत अधिकाधिक दुर्लक्षित होऊ लागली. तिच्या अशाप्रकारे कोषात जाण्याचं नेमकं कारण तिच्या सुनेच्या म्हणजे रोहिणीच्या लक्षात आले. मनाने निर्मळ आणि प्रेमळ असणारी आपली सासू अती चिंता करते आहे आणि मनमोकळेपणाने जीवन जगत नाहीये हे कळल्यावर तिने आपल्या सासूला यातून बाहेर काढायचे ठरवले. याकरता रोहिणीने  शांताच्या आई ची म्हणजेच आपल्या आजेसासूची,  शांताच्या काही मैत्रिणी आणि  मानसशास्त्रज्ञ असलेल्या आपल्या एका बहिणीची मदत घेतली. जीवनात यशस्वी होण्यासाठी सारासार विचार करणं गरजेचं आहे हे निश्चित पण जीवनाचा आनंद घेण्यासाठी अती चिंता करणं, प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघणं. सतत चूक की बरोबर या द्विधा मनस्थितीत राहाणं अयोग्य आहे. मुलांना चांगले संस्कार देऊन योग्य पद्धतीने मोठं केल्यावर त्यांच्या क्षमता, कर्तृत्व या सगळ्यांवर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य केले पाहिजे. हे  पटवून दिले. या सगळ्या गोष्टी शांताच्या आईने खूप छान हाताळल्या. शांताच्या पापभिरू स्वभावाला अनुसरून परिणामांची चिंता न करता श्रध्दा ठेवून काम करत राहावं आणि  निर्धास्त असावं हिच तर अध्यात्माची खरी शिकवण आहे. आनंद देणं,मिळवणं आणि आनंदी राहाणं हे पाप नाही, आनंद मिळत असेल तर भीती न वाटून घेता तो स्वीकारता आला पाहिजे. योग्य मार्गाने , योग्य कर्माने वागणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला आशिर्वाद दिला पाहिजे स्वतः समाधानी राहून त्यांना यश दिलं पाहिजे. ही शिकवण  देऊन रोहिणीच्या  आजेसासूबाईंनी या वयातही काळाला अनुसरून मार्गदर्शन केले. शंकेखोर मन म्हणजे दुःखाला आमंत्रण हे समजावले. याचा परिणाम म्हणून की काय देवभोळी शांता सुद्धा आता तिच्या आई सारखी सगळ्यांची लाडकी आज्जी झाली.

                         सौ. मंजिरी जानोरकर.