” वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे,
पक्षी ही सुस्वरें आळविती….”
हिरव्या गर्द वृक्षांच्या सानिध्यात राहायला आवडणार नाही असा माणूस दुर्मिळ. म्हणूनच घरांची जाहिरात करताना ‘निसर्गाच्या सान्निध्यात’ असे आवर्जून बिंबवले जाते. आसपास पक्षी, हिरवळ,दाट झाडी असावी असे सगळ्यांनाच वाटते. लहानपणी कोणाला लाडिक रागवायचे झाले तर,” तुझे/त्याचे घरं उन्हात बांधू हं.” असे मोठी माणसे म्हणतं ते त्या वयात अगदी खरं वाटायचे. अमुकतमुक व्यक्तीला खरंच खूप शिक्षा दिल्याचे समाधान मिळायचे.
पक्षी आसपास असणे ठीक आहे पण आता आता जंगलच मानवी वस्तीत येऊ लागले आहे. रानगवे, बिबट्या सर्रास मानवी वस्तीत दिसून येताहेत. कधी अन्नपाण्याच्या शोधात तर कधी वाटचूकिने. कारणं कोणतीही असोत वन्यप्राण्यांचा वावर मानवी हद्दीत वाढलाय हे नक्की. पूर्वी माणूस शिकार करायचा आज तो शिकार होतोय. दोघांनीही एकमेकांच्या आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त दखल दिल्याने असे होत असेल.
असो जीवन चक्रात प्रत्येक गोष्टिला महत्व आहे. पशुपक्षी, वन्यप्राणी, मनुष्यप्राणी सारेच समान आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ह्या सगळ्यांची साखळी सुरळीत असायला हवी. ‘जीवो जीवस्य जीवनम’ असे हे चक्र विश्वाचे मूलाधार आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडला तर परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. ह्या काळात वणवा लागल्याच्या तसेच भू स्खलनाच्या, वादळाच्या अशा अनेक प्रलयंकारी घटना वारंवार होताना दिसत आहेत. पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी दूरदूरपर्यंत ह्याच प्रकारच्या गोष्टी होताना ऐकायला मिळते आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक गोष्टींचा एकमेकांशी असलेला हा संबंध जोडलेला आहे हे जाणले होते. समतोल राखण्यातच सगळ्यांची उन्नती आहे म्हणूनच वृक्षवल्लींचे संवर्धन, संगोपन आणि निर्माण व्हायला हवे हेच संतांनी सुद्धा फार पूर्वी सांगितले आहे.
पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा.
सौ.मंजिरी जानोरकर.

