“प्रेम म्हणजे मुर्तीमंत सौंदर्य असतं, देवाच्या सुंदर मुर्तीच्या सुंदर पावलांवरच्या पवित्र फुलासारखं असतं प्रेम, पुरुषांच्या आश्वासक नजरेत दिसतं, स्पर्शाची गरजही शब्दांत भरून निघते तिथे प्रेम असतं, काळ्याभोर केसांमध्ये माळलेल गजऱ्याच्या मोहक वासात प्रेम असतं, हंबरडा फोडून गाईला ढुशी देणाऱ्या वासराला सुद्धा जे कळतं ते प्रेम असतं. शिवाच्या पिंडीवर व्हायलेल्या बिल्वपत्रावरच्या पांढऱ्या फुला इतकं निर्मळ असतं प्रेम …..”. मंगेश पाडगावकरांची प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता शिकवत असताना स्वाती मॅडम अगदी मनापासून प्रेम या शब्दाचा अर्थ सांगत होत्या तेही आताच्या या पिढीला ज्यांना प्रेम म्हणजे शरीर हेच फक्त माहीत होतं. प्रेम जे ओरबाडून मिळवायचे असते आणि नाही मिळवता आलं तर जे जीवावर बेतू शकते. हे सिनेमांमधून किंवा आसपासच्या भागात घडणाऱ्या घटनांमधून कळत आलेल्या प्रेमाची अशीही काही व्याख्या असू शकते हे मुलंही अगदी शांतपणे ऐकून घेत होती. अतिशय तल्लीन होऊन शिकवणं हे स्वाती मॅडम चे वैशिष्ट्य होते. म्हणूनच त्यांच्या लेक्चर्स ना नेहमीच क्लासरूम पूर्ण भरलेली असायची. त्यातून आज मॅडम प्रेमाची कविता शिकवणार आहेत हे आधीच माहीत असल्यामुळे जरा जास्तच गर्दी होती वर्गात. अचकट विचकट काही तरी ऐकायला मिळेल म्हणून आलेली मुलं सुद्धा या वर्गात कधी रमली हे त्यांनाही कळलं नसावं. एखाद्या सुंदर नाटकातला परिसंवाद ऐकत असल्याप्रमाणे सगळे भारून गेले होते. टाळ्यांच्या गजराने दचकून जाग यावी त्याऐवजी लेक्चर संपल्याची घंटा वाजली आणि मुलांची तंद्री भंगली. प्रेमाबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मनात घोळवत मुलं बाहेर पडली. स्वाती मात्र अजूनही त्याच विचारात यांत्रिकपणे स्टाफ रूम मध्ये जाऊन बसली सुदैवाने रूममध्ये कोणी नव्हते त्यामुळे विचारांची शृंखला तुटली नाही. “किती सुंदर अर्थ सांगितला मी वर्गात प्रेमाचा. ” स्वतःचच कौतुक वाटून ती उपरोधिक हसली. ” मी सुद्धा प्रेम केलं, इतकी वर्षे संसार करते आहे. मला मिळालं प्रेम ! खरं प्रेम? नवरा, मुलं सगळ्यांना सगळं मनापासून दिलं आणि फक्त करत राहिले पण रागाच्या भरात किती अन् काय काय बोलला सुहास आज, माझ्या मनाचा जराही विचार आला नाही त्याच्या मनात? नाटक, नाटक करते म्हणे मी. याची काळजी म्हणून बोलावं तर ती कटकट. घर मी एकटीच आवरणार आणि पसरताना बाप आणि मुलं सगळ्यांचा सहभाग. मुलांना सवयी लावताना मी एकटीने लावायच्या हा त्यांच्या समोर गोड राहणार. लौकिक अर्थाने सगळी अगदी दागिन्यांची, कपड्यांची सगळी हौस मनापासून करणारा सुहास हल्ली जरा जास्तच चिडतो आणि मग काहीही बोलतो. माझ्या आताच्या परिस्थितीत मला त्याने जास्त समजून घेण्याची गरज आहे. बायका चाळीशीत किती हळव्या होतात आणि नवरे किती काळजी घेतात. खरंच नाटकं करणाऱ्या कितीतरी बायका ती शाळेतच आसपास बघत होती. “बरं वाटत नाही, शॉपींग करावं असं वाटतय, आज स्वयंपाक करायची इच्छाच नाही पार्सल आणूया” हे आणि असेच बरेच काही नवऱ्याला फोन वर सांगून स्वतःचे लाड करून घेत असतात, पण आपण छोट्या मोठ्या गोष्टी सुहासला सांगतही नाही पण तो स्वतः सुद्धा कधी विचारत नाही. दगदग, थकवा, वेदना कधीच काहीच माझ्या चेहऱ्यावर याला दिसलंच नसेल का?? बरं मी अपेक्षा नाही करत असही नाही मलाही मन, भावना आहेत ना?? ते तर बाजूलाच पण आज बोलताना जरा भान ठेवलं असतं तर…. मी खूप दुखावले गेले हे सुद्धा जाणवलं नसणारच नेहमी प्रमाणे. हे कसलं प्रेम आणि हे कसं शिकवणार मुलांना? त्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे ही. प्रेम ही वास्तवात कितीही गोड संकल्पना असली तरी मुलांच्या मनात ती सकारात्मक पद्धतीने रूजवण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून आपली आहे. ” विचारात गढलेल्या स्वातीच्या फोनची रिंग वाजली सुहासचा मेसेज होता “Sorry dear, I am extremely sorry. तू आमच्यासाठी खूप करतेस आणि मी चिडून खूप बोललो. दुखावली असशील ना तू sorry. घरी आल्यावर बोलू बाय Love you dear.” वाचता वाचताच स्वतीचे डोळे वहायला लागले. आपण बायका अशाच असतो भाबड्या जरा नवरा गोड बोलला आणि sorry म्हणला की लगेच पाघळतो. आताही आपलं तेच होतंय पण खरंच फक्त sorry म्हणून जखम भरून येते का?? आपल्या नवरा बायको मधल्या कितीतरी गोष्टी आपण दोघेही फक्त एकमेकांना सांगू शकत असतो पण खरंतर मी हेच करायला गेले होते ना?? संवाद साधताना तक्रारी, अपेक्षा, भावना, राग, हेच तर शांतपणे बोलायचं असतं ना! मग त्रागा करून काय मिळाले सुहासला नेमके? बरेचदा उत्तर नसतं किंवा नकार ऐकायची तयारी नसते ना माणसाची त्यावेळी हे आक्रस्ताळेपणा चे हत्यार उपसले जाते पण त्यामुळे होणाऱ्या जखमा त्यांचे काय?? Sorry बस झाले इतकीच किंमत इतक्या वर्षात हे अनेकदा झाले आहे पण आता बास झालं… विचारांच्या तंद्रीत हरवलेली स्वाती तिच्याही नकळत एकटीच रडू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने मागच्या बाजूला बसलेल्या मोठ्या बाई म्हणजे सगळेच जण त्यांना तसं म्हणायचे कारण त्या बऱ्याच सिनीअर होत्या आणि ही शाळा सुरू झाली तेव्हापासून तिथे शिकवत होत्या. त्यांनी मायेने स्वातीला थोपटले त्या अवचित प्रेमळ स्पर्शाने स्वाती त्यांच्या कुशीत शिरून खूप रडली. तिचा भावनांचा ओघ जरा कमी झाल्यावर काहीही न सांगता सगळं कळल्यासारख त्या म्हणाल्या, ” स्वाती आज वर्गात तू प्रेमाचा अर्थ सांगितला हो न? पण ते साहित्यिक आणि कवी मनातलं प्रेम बरं का. खरं प्रेम म्हणजे हे आपल्याला बसणारे चटके आणि गदगदून धक्के देणारे आजूबाजूच्या जवळच्या माणसांचे शब्द आणि हे सगळं सहन करत खंबीरपणे उभे राहण्याची आपल्यातली सकारात्मकता जी आपलं घर, कुटुंब सावरते ते खरं प्रेम. ऊठ बाळ डोळे पूस आणि स्वतःला या सगळ्यात कसं सांभाळायच याचा विचार कर, जप स्वतःला कारण आधी आपण स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे, स्वतः स्वतःचा मान राखणं ही स्वतःची जबाबदारी आहे ते जमलं की इतरही आपला अपमान करायला धजावत नाहीत.” मोठ्या बाई कमी शब्दात खूप काही बोलून गेल्या स्वाती सुद्धा मनात एक दृढ संकल्प करून घरी जायला निघाली आज एका अनुभवी शिक्षीकेने तिला प्रेमाचा वास्तविक अर्थ सांगितला होता.

