मनू ने जरा तणतणतच घरात प्रवेश केला. सासर घराजवळच असल्याने बरेचदा ऑफिसला जाताना मनू आईकडे येऊन जात असे. आजसुद्धा नेहमी प्रमाणे ती आईच्या घरी आली होती पण चिडचिड करत जोरात बेल बडवत. तसा मनूच्या स्वभाव शांत होता असं नाही पण ती समंजस होती विनाकारण चिडणं हा तिचा स्वभाव नव्हता आणि त्यातून सासरी गेल्यापासून तर ती फार जबाबदारीने वागत होती. म्हणूनच आजचा तिचा अवतार बघून काहीतरी बिनसलं आहे हे आईने ताडलं. हातात पाण्याचा पेला देऊन आईने तिला शांतपणे बसून,” नीट काय झालं आहे ते सांग. असं म्हणत डायनिंग टेबलवर बसवलं. “आई तू आम्हा मुलांना का ग वळण लावलस, शिस्त, नीटनेटकेपणा शिकवलास ?? काय गरज होती वेळोवेळी टोकून चांगलंच वागायला शिकवायची ??” आता मात्र उर्मिलाला म्हणजे आईला गालातल्या गालात हसू आलं, पण ते न दाखवता तिचं म्हणणं ऐकायला ती जरा सैलावुन बसली. मनुने आई निवांत बसलेलं बघून तक्रारींचा पाढा सुरू केला. “आई! आपलं काम आपण करावं, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात हे तू मला आणि दादालाही शिकवलंस, होना म्हणूनच वहीनी नोकरी करत असुनही आपल्या घरात वाद होत नाहीत. तू, बाबा, दादा सगळेचजण किती समजून घेता वहिनीला. आमच्याकडे याच्या उलट आहे अगदी. मनिषला (मनूचा नवरा) तर प्रत्येक गोष्ट हातात लागते. डबा करण्यापासून भरण्यापर्यंत सगळं मीच करते त्यात मधेमधे हा सतत हाका मारत राहणार. बरं जाताना सगळं घर विखरून ठेवणार तेही आवरा, मग स्वतःचं आवरा, तरी बरं आई घरातलं बाकी सगळं बघतात म्हणून नाहीतर मला नाष्टा करायला सुद्धा वेळ मिळाला नसता. त्या आणि बाबा काय ते समजून घेतात मनिषला हटकतात पण हा अगदी ढिम्म काही बदल नाही. कंटाळा आलाय गं. मला एक कळत नाही की इतक्या समंजस आई बाबांनी मुलाला काही वळण कसं लावलं नाही, आणि त्याचं काही बिघडतंय का? आधी आई आणि आता मी याच्या दिमतीला हजर आहोतच.” असं बोलून मनू थांबली. ती गप्प होताच आईने मनूच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागल्या, ” मनू अगं नवी नवरी आहेस तू म्हणुनच सतत तू जवळपास असावीस असं मनिषला वाटत असणार म्हणून तो तुला काही ना काही कारणाने हाका मारत असतो. कोणतीही आई मुलांना वळण लावतच असते आणि त्यातून रेणूका ताईं ज्या नोकरी करत होत्या, त्यांनी तर मुलांना स्वावलंबी बनवलंच असणार ना?? तुमचे अजून नव्या नवलाईचे दिवस आहेत त्यात कामांच्या वेळा सांभाळून एकमेकांना मिळणारा वेळ जास्तीत जास्त एकत्र घालवावा असे वाटण चुकीचे नाही ना. आणि तुला कोणी सांगितलं की आपल्या घरात फक्त आम्हीच तिघं समजुतदार आहोत ते? तुझी वहिनी सुद्धा खूप समंजस आहे. वेळप्रसंग बघून ती बरीचशी कामं संपवून जाते. मला फार कामं मागं पडु नयेत म्हणून लवकर उठून सगळं करते. मी काही म्हणले तर “आई करायचं तेंव्हा केलंत तुम्ही आता मी आहे ना.” असं म्हणून मला गप्प करते. काय असतं ना मनू आम्ही काय किंवा तुझे सासू सासरे काय. या सगळ्या मधून गेलेलो आहोत. नवीन नवीन लग्न झाल्यावर हे चालतच एकदा का मुलं झाली की मग आईबाबा म्हणून जबाबदारी येते आणि मुलांना वळण लावण्याची, शिस्त लावण्याची, स्वावलंबी बनवण्याची गरज जाणवायला लागते. त्याकरता आपोआपच आईबाबा स्वतः त्याचे पालन करायला लागतात. तेंव्हा लहानपणी लागलेलं वळण, शिस्त उपयोगी पडते ते वाया जात नाही. आई वडील जे संस्कार करतात ते रोजच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी असतात याची खरी जाणीव आईबाबा झाल्यावर होते बाळा.” बोलत बोलत आठवणीत हरवलेल्या आईला मनू बघत होती आणि तिच्या त्या बोलण्याची मनातल्या मनात स्वतःशी सांगड घालत होती…
सौ.मंजिरी जानोरकर.


Lekh faar chaan aahe
Thank you 😊