वसुधा चे लग्न तिच्या वयाच्या बावीसाव्या वर्षी झाले, त्या वेळी तिच्या सासुबाई पन्नासच्या आसपास असाव्यात. आता तिच्या लग्नाला पंचवीस वर्षे उलटून गेली होती, ती आता पन्नाशीला आणि सासुबाई पंच्याहत्तरीला आल्या होत्या. तीच्या लग्नाच्या वेळी असलेला त्यांचा ताठरपणा आणि तिचा अल्लडपणा सुद्धा गेल्या काही वर्षांत गळून पडला होता. तश्या त्या टिपिकल सासूपणा करणाऱ्या नव्हत्या. तरीही सासू या नात्यात ओघाने येणारी आढी मात्र आवर्जून मोडावी इतक्या त्या सरळ सुद्धा नव्हत्या. तसं भांडण, कटकटी फार नसल्या तरी मन दुखावणारी शाब्दिक चकमक चालायचीच. आताशा मात्र त्या शांत झाल्या होत्या. वसुधाही या सगळ्याला सरावली, दुर्लक्ष करायला शिकली होती.
वयाच्या या टप्प्यावर येई पर्यंत वसुधाने मनाशी काही गोष्टी ठरवून टाकल्या होत्या. आपण केलेल्या चुका आणि सासु म्हणून त्यांच्या न आवडलेल्या गोष्टी आपण करायच्या नाहीत. बदलत्या काळानुसार झालेले बदल आपल्या पिढीने मागच्या पिढीच्या मानाने लवकर स्विकारले पाहिजे हे तिला जाणवत होते. आपलं लहानपण आणि मुलांच बालपण यातला फरक ती अनुभवत होती. पुढच्या पिढीच्या अपेक्षा, गरजा, जबाबदाऱ्या सगळं जरा निराळं असणार आहे हे वसुधाला माहीत होते आणि म्हणूनच काळाप्रमाणे नात्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात बदल होतीलच हेही ती जाणून होती. आपल्या आधीच्या पिढीच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा आपण पुढच्या पिढीकडून करणं योग्य नाही हे तीने स्वतःला समजावलं होतं. येणारी सून काय किंवा आपली मुलगी काय! दोघींच्या जडणघडणीचा काळ एकच आहे. त्यांची आव्हानं, घराबाहेरील परिस्थिती सारखीच असणार. त्या गोष्टी हाताळण्याची पद्धत मात्र त्यांच्या स्वभाव, संस्कार आणि परिस्थिती यावरून ठरेल. विचारांच्या तंद्रीत हरवलेली वसुधा भुतकाळ फिरून भविष्या पर्यंत कधी जाऊन आली हे तीचं तिलाही कळलं नाही कारण अजून सून यायला आणि लेकीच्या लग्नाला नाही म्हणलं तरी दोन ते तीन वर्ष वेळ आहे याचा विचार करून ती स्वतःशीच हसत वर्तमानात आली. दुपार सरून संध्याकाळचे वेध लागले होते, चक्क आजकाल चाडेचारचा चहाचा गजर होत नाही. हे आठवून ती चहा करायला उठली. आश्चर्याची बाब म्हणजे स्वयंपाकघरात काहीतरी आवाज येतो आहे हे ऐकून तीने डोकावले तर चक्क सासुबाई चहा ठेवत होत्या. याही वयात तिला गिल्टी वाटलं. ती आत आलेली पाहून सासुबाई म्हणाल्या, “बस गं घे आज माझ्या हातचा चहा बघ तरी मला येतो की नाही अजून ते.” असं म्हणून स्वतःच हसल्या. चहाचा कप वसुधा ला देऊन तिला बसवत त्या बोलू लागल्या, ” वसुधा तुमच्या लग्नाचा वाढदिवस या वर्षी मी करावा असं माझ्या मनात आहे. तू या घरात आल्यापासून सतत घरासाठी करत आलीस. तुला मनापासून नोकरी करायची होती हे मला माहीत होतं पण विश्वासच्या व्यवसायाची गाडी सुरळीत होत होती तो घरात पैसा देईल पण वेळ नाही हे मला माहीत होतं. तू जे संस्कार मुलांना या घराला आणि विश्वासला सुद्धा दिलेस ते कोणीच कधीच करू शकणार नाही हे मी तूला घरात सून म्हणून आणलं ना तेंव्हाच जाणलं होतं. तुझं कौतुक मी कधी तुझ्या समोर केलं नाही पण मला कायम तुझा अभिमान वाटला आहे. विश्वास च्या आजारपणात तू ज्या पद्धतीने कुटुंबात उभी राहीलीस तेही त्याच्या चिडचिडेपणाला तोंड देत. हे सगळं मी बघत होते. कधीतरी बोलावं तुला सांगावस वाटायचं पण तो मनाचा मोठेपणा यायला जरा वेळच लागला बघ. आज का कुणास ठाऊक पण ठरवलं मुलांच, लेकीच, नातवांच कौतुक कायमच करतो आज थोडं सुनेशी बोलावं, तिच्यासाठी काहीतरी करावं. तसं तर हे सगळं तुमचच आहे पण हाताने द्यावे, तोंडाने कौतुक करावे असं वाटलं. ते काही नाही ठरलं या वेळी तुमच्या लग्नाचा वाढदिवस मी साजरा करणार.” एवढं बोलून वसुधाच्या हातातला कप घेऊन त्या गेल्याही. त्यांच्या पाठीकडे वसुधा पाहातच राहीली. मगाशी मी जे मनात बोलत होते ते यांनी ऐकलं की काय? हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर होता.


Khupch chhan lekh ahe agadi manatle lihale ahe
Thank you 😊