दाहक काही घटना घडतात आणि मन विषण्ण होतं आणि विचारांची आंदोलनं सुरू होतात. आजकाल मुलं अशी का वागतात?? या प्रश्नांनी मन भंडावून गेले होते. काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न……

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक पालकांना आधी समजला पाहिजे. अती प्रायव्हसी देण्याच्या नादात मुलांना नात्यांपासून आणि पर्यायाने नातेवाईकांपासून तोडले जाते आहे. तासंतास मोबाईल फोन वर मित्रमैत्रिणीं सोबत रूम बंद करून बोलत बसणाऱ्या पाल्यांना तेही शाळा, college मध्ये शिकत असलेल्या मुलामुलींना जाब विचारणारे पालक अडचणीचे वाटत आहेत. मुलांचा कान पकडणारी पिढी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल मुळे violent होत चाललेली ही पिढी सहजच हत्यार काढून सपासप वार करू शकते त्यावेळी समोर कोण आहे याचे भान राहात नाही. याला कारणीभूत म्हणजे घरबसल्या अतिरंजित सिरीज आणि मुव्हीज आहेत. सतत समोर सुरू असलेला रक्तरंजित पराक्रम आणि सगळेच भान सोडून चालणारे अश्लील चाळे आणि प्रत्येक वाक्यात ऐकायला येणाऱ्या शिव्या हे बघणं आणि तसं वागणं मुलांना गैर वाटत नाही. कुठे थांबायचे हे खरंतर सगळ्यांनाच आणि विशेषतः पालकांना कळायला हवं. पाल्यांना काय आणि किती प्रमाणात द्यावे कुठे, कधी आणि कसं नाही म्हणायचे. पाल्य आणि पालक यांचं नातं कसं विकसित करावे हे महत्त्वाचे आहे. त्या करता अनुभवी आणि घरातील मोठी मंडळी यांची मदत घ्यायला हवी. पूर्वी एकत्र असणारी कुटुंब काळानुसार बदलत गेली, दहा दहा जणांची कुटुंब सहा जणांची आता तर आम्ही दोघे आणि आमचे दोन किंवा एकच त्यातही सगळेच बिझी. नोकरी, शाळा, करिअर या सगळ्याची सांगड घालताना पालकांची होणारी दमछाक, हा आपला विकसित समाज. बरं हा आरसा जो कोणी दखवतो तो पुरोगामी, तरुण तरुणींना कुटुंब नावाच्या जोखडात बांधणारा म्हणून टार्गेट होणार हे नक्की. विस्कटलेली नाती आणि तुटलेले संवाद , उडालेला विश्वास पर्यायाने संपलेला नात्यांमधला मोकळेपणा आणि आलेलं अवघडलेपण.

ही साखळी तुटायला हवी आहे.