दैवी स्पर्श

                                                                          दैवीस्पर्श

       आज माणूस देव बनलाय ! हो खरंच. एका क्लिक वर घर बसल्या सारे काही मागवू लागलाय अगदी देवागत. मोबाईल प्रत्येकाचा बंधू,भ्राता,अन्नदाता,सखा, त्राता बनलाय. माणसाला कोणाचीही गरज उरलेली नाही. सगळ्यांमध्ये असूनही एकटं राहायला त्याला आवडू लागलंय फक्त हातात फोन हवा. भ्रमण ध्वनी बस. मग वेदना- संवेदना, तहान -भूक ह्या जाणीवाच उरत नाहीत आणि वाटलंच तर उबेर,स्वीगी ह्या सख्या आहेतच.
हा मोबाईल काळाची गरज असला तरी तो आता असुरा प्रमाणे हावी होतोय हे लक्षात घ्यायला हवे. आजुबाजुची आपली माणसे तो जवळ जवळ गिळून टाकतोय आणि आतुन बाहेरुन माणसाला पोखरून टाकतोय.
         भरभरून मिळणारे अती ज्ञान, नोको इतके सल्ले , अनावश्यक माहिती पुरवून माणसाला अपंग बनवतोय.
ही वस्तुस्थिती आहे. गरज किती आहे वापर किती हवा हे इतकेच काय ते तो सांगत नाही. पण त्याच्याशी कोणाला काही देणेघेणे नाही. सगळेच घरी बसून अगदी मैदानी खेळ सुद्धा बटणं दाबुन खेळता येतात. नाती वॉट्सअप ग्रुप मध्ये, मित्रांचे सुद्धा ग्रुप, गप्पा सुद्धा शांत. ह्या सगळ्यात फक्त डि . जे. चे आवाज तेही कर्यक्रमाच्या निमित्ताने ऐकू येतात. म्हणजे एकतर अति  शांती   नाहीतर अति आवाज.
           ह्या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट हरवलीये ती म्हणजे दैवी स्पर्श !  आईचा वात्सल्याचा स्पर्श, पित्याचा आश्वासक स्पर्श, बहिणीचा मायेचा स्पर्श, आज्जीचा स्नेहल स्पर्श, पत्नीचा प्रेमळ स्पर्श  हे सगळे दैवी स्पर्श मोबाईल देऊ शकत नाही. ह्या स्पर्शातुन माणूस घडत असतो. फक्त मोठं होणं म्हणजे घडणं नाही. स्वीगी च्या जेवणात आईच्या हातची अमृताची चव नाही, पत्नीचं प्रेम नाही ते फक्त उदर भरणं आहे, स्वतःच्या माणसांसाठी केलेल  भोजन  नाही त्याला तो स्वर्गीय स्पर्श झालेला नाही.
            घराच्या बाहेर रहाणाऱ्यांना सोय म्हणून ह्या गोष्टी निश्चित स्वागतार्ह आहेत आवश्यक आहेत पण म्हणून आपल्या माणसांची कदर करणं, आदर करणं सुद्धा गरजेचे आहे. सहज मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टी किती आवश्यक आहेत हे समजायला हा दैवी स्पर्श जादु प्रमाणे मदत करतो. त्याची ती मदत घेतली पाहिजे. आपली माणसे जवळ असताना फोनचा  वापर कमी करायला पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना फोन मध्ये फोटो काढत बसण्यापेक्षा मोकळे पणाने सगळ्यांच्या भेटी घेतल्या तर आठवणी गोळा होतील फोटो चित्रबद्ध करत असतील तर भेटी आठवणी मध्ये राहतात. माणूस लांब गेला कि त्याची किंमत कळते असे म्हणतात म्हणून जवळ असे पर्यंत त्याला आठवणीत साठवून ठेवायला हवे डिजिटल अल्बम त्या दाखवेल पण मन तो स्पर्श,संवाद स्मृतींमध्ये भरून ठेवेल. एकटेपणाची सल काढायला मोबाईल सारखी साधने वापरली तर चालेल पण त्याच्यामुळे आपण एकटे पडत नाही ना हे पहिले पाहिजे आणि भविष्य सुंदर करण्याकरता दैवी स्पर्श अनुभवायला अन द्यायला सुद्धा शिकले पाहिजे.