“आई आई बघ ना गं दादानं माझं चॉकलेट खाल्लं आणि मी तुला सांगतेय म्हणून मला मारतोय……” पाच वर्षांची श्रावणी दादाच्या विरोधात आपल्या आईकडे तक्रार घेऊन रडत रडतच आली. आता आपली आई दादाला चांगलं ठोकून काढेल आणि आपल्याला दुसरं चोकलेट मिळेल असं तिला वाटलं पण हातातलं काम न थांबवताच विद्याने पर्स मधून दुसरं चोकलेट तीला दिलं आणि, “आता आपण किनाई दादाचं घरं उन्हातच बांधू हं आमच्या श्राऊ चं चोकलेट घेतो म्हणजे काय??” असं म्हणून पुन्हा कामाला लागली. श्रावणीने मात्र दोन मिनिटे तिथेच थांबून विचार केला की ज्या अर्थी आई घर उन्हात बांधू म्हणतीए त्या अर्थी ठोकून काढण्यापेक्षा हि शिक्षा जास्त मोठ्ठी असली पाहिजे. मग मनातल्या मनात खूष होत आणि हाताचा अंगठा नाचवत आठ वर्षाच्या दादाला चिडवत आईने घोषित केलेली शिक्षा सांगितली. साकेत म्हणजेच दादा जरा चपापला आणि हि नवीन शिक्षा जास्त भयंकर आहे असे वाटून धावतच आईकडे गेला. आपली चूक मान्य करून पुन्हा असे न करण्याचे बजावायला तो विसरला नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून पुर्वी म्हणजे श्रावणी ची आतेबहीण तिच्या कडे खेळायला आली त्यावेळी कालचा प्रसंग तीला सांगायला श्रावणी विसरली नाही, मग काय दोघी मिळून साकेतला चिडवायला लागल्या, ‘दादाच घर उन्हात, दादाचं घर उन्हात.’ त्याचा रडवेला चेहरा पाहून मग आज्जीने दोघींना गप्प केले. दादाचीही समजूत काढून लाडूचा खाऊ सगळ्यांनाच दिला मग काय सगळं विसरून मंडळी खेळायला पळाली तेही उन्हात आज्जी मात्र हाका मारत राहिली.
‘रम्य ते बालपण.’ किती पटकन पटतं ना त्या वयात सगळंच . जास्त विचार करत नसतो ना तेंव्हा आपण. जसजसे मोठे होत जातो तसतसा हा इनोसन्स कुठे जातो कुणास ठाऊक. त्या वेळी आईने दिलेल्या शिक्षेची शहानिशा करत बसण्यापेक्षा आपण मोठं झाल्यावर घर बांधताना नक्की सावलीत बांधायचं हे मात्र नक्की ठरवलं जायचं आणि ते सुद्धा मनातल्या मनात. आपल्यातल्या जवळपास सगळ्यांनाच ही शिक्षा कधी ना कधी मिळालीच असेल. मी जेंव्हा नवीन घर घेण्यासाठी बघत होते त्यावेळी मला ती शिक्षा आठवून हसू आले, मोठी गंमत वाटली.
खरंच विचार केला तर आपणच घालवलेल्या सावलीची अपेक्षा आपणच कशी करू शकतो ?? सावली मग ती झाडांची असो अथवा नात्यांची. मोठी मोठी झाडं सुखसुविधा, मोठी जागा हवी म्हणून पाडतात. लहान घरात गर्दी नको म्हणून विभक्त होतात. कारणं काहीही असोत पण ही सावली आपणच घालविली आहे ती टिकवायलाच हवी. घर जरी सावलीत नसलं तरी नात्यांची वीण घट्ट असायला हवी प्रेमाची छाया अनुभवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. काडी काडी जमवून बांधलेल्या घराला घरपण देणारी, आपली माणसं सुद्धा घराला सावली देतात. अगदी भरलेलं घर जरी कठीण असलं तरी सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारी कुटुंब असतातच. सणवार लग्नकार्य आशा प्रसंगी जमलेल्या मुलांची सुद्धा लुटूपुटूची भांडणं, खेळणं या सगळ्या गोष्टींचा घरात सकारात्मक प्रभाव पडतो. चिडणं, चिडवणं यातही एक गंमत असते.
बहिण भावंडांची छोटी छोटी भांडणं आणि आई बाबा, आज्जी आजोबांचं मुलांना दटावणं किती इनोसंट आणि देखणं चित्र आहे ना हे, अगदी कालपरवापर्यंत जवळजवळ सगळ्या घरांत दिसणारं. अजुनही कदाचित काही घरांमध्ये पाहायला मिळत असले सुद्धा पण प्रमाण कमी झाले आहे. हसरं आणि आनंदी कुटुंब या पेक्षाही मोबाईल मध्ये गुंगलेलं कुटुंब जास्त पाहायला मिळतात. उन्हात घर बांधण्याचं किंवा असण्याचं दुःख या पिढीला खरंच कळेल का ?? त्या शिक्षेची गंमत आताच्या ई-नोसंट मुलांना वाटेल का ?? याचा विचार करायला हवा.
पटलं तर शेअर करा 👍🏻
सौ. मंजिरी जानोरकर.


वा छान, सुरवाती वरुन विषय शेवटी एका शिकवणीकडे जाईल असे वाटत नाही
खरे आहे खुप छान लिहिले