‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ‘

             आषाढी, कार्तिकी भक्तजन येतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात. हि वारीची परंपरा फार प्राचीन आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्यासह वारी करणारे वारकरी आजही परंपरागत वारी, करताहेत. खरंच किती विलक्षण अनुभव असेल हा. “एक तरी ओवी अनुभवावी” त्याप्रमाणे एकदा तरी वारी करावी हे खरं. तो योग जेंव्हा येईल तेंव्हा घ्यावाच पण  घरात बसून रोजच्या वारीतील घडामोडी टिव्ही वर बघून सुद्धा खूप छान वाटतं. असो ! आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरा फार मोठी आहे.  ज्ञानेश्वरांनी आपले विहीत कार्य पूर्ण करून झाल्यावर गुरू आज्ञेने संजीवन समाधी घेतली. ही समाधी सर्व सामान्य लोकांच्या आकलनापलिकडील गोष्ट आहे.  तो अध्यात्माचा विषय आहे.  अर्थातच हे आध्यात्म, भगवंताशी एकरूप होणं, समाधी लागतं हे सगळं नेमकं कशासाठी तर मानसिक समाधान आणि तृप्ती करता. आत्मिक शुद्धी वैगेरे या गोष्टी खूप वरच्या पातळीवर आहेत. सर्वसामान्य माणूस हा रोजच्या जीवनातील तणाव, चिंता, समस्या या सगळ्यां पासून मुक्ती मिळावी म्हणून झटत असतो. क्षणभर देवाच्या दर्शनाने मिळणारी ऊर्जा आणि विसावा हवा असतो.  आयुष्यातील काही काळ फक्त वारीवर केंद्रीत करून पांडुरंग चरणी समाधी लावायची आणि चालत पंढरी गाठायची. अर्थात   सर्व सामान्य माणसाच्या बाबतीत समाधी लागणे म्हणजे एखाद्या विषयावर, गोष्टी वर तंद्रि  लागणे.  सहजच कोणाचं लक्ष नसेल तर,”कुठे समाधी लागली आहे?” असं विचारलं जातं. अर्थात हा गंमतीचा भाग सोडला तर समाधी लागणं ही अवघड गोष्ट आहे.  माणूस फार कमी वेळा एखाद्या गोष्टीवर एकाग्र होऊ शकतो. हेच एकाग्र होणं म्हणजेच समाधी लागणं आहे खरंतर. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुले लवकर एकाग्र होतात. आवडती कोणतीही गोष्ट, वस्तू,खेळ अगदी आवडता खाऊ समोर आला की मुलं सगळं सोडून आपला मोर्चा तिकडे वळवतात आणि रममाण होतात. कदाचित म्हणूनच आपण मुलं ही निरागस असतात आणि देवाघरची फुलं असतात असं म्हणतो. हे सहज विसरणं आणि दुसरीकडे तितक्याच पटकन लक्ष वळवणं, हे मोठं झाल्यावर  कठीण का होतं? हे सांगता येणं अवघड आहे. ते इतकं कठीण आहे की त्या करता डॉक्टर, योगा, ध्यान धारणा इत्यादी साधनं अभ्यासावी लागतात. जे की आपण लहानपणापासून केलेलं आहे पण सराव कमी पडला, त्याहीपेक्षा आत्मविश्वास कमी झाला आणि स्वतः कडूनच खूप अपेक्षा वाढल्या म्हणून ते आत्ता अवघड वाटत आहे. आपल्यातल्या उणीवांवर मात करायला हवी हे खरं आहे पण आपल्या क्षमतांची जाणीव विसरून चालणार नाही. स्वतःचा स्विकार मोठ्या मनाने करता आला तर आपल्या अपेक्षा आणि जबाबदारी यांची सांगड घालता येईल. कामांचं ओझं वाटण्यापेक्षा आवडीने करता येणं गरजेचं आहे. एक बटण बंद करून चटकन दुसरीकडे वळणं हे तेंव्हाच जमेल जेंव्हा दडपण नसेल. दडपण असलेल्या व्यक्ती समाधी साधू शकत नाही. समाधानी आणि शांत चित्त हे सुखाचे आगर आहे. हे सुख अनुभवण्यासाठी लहान मुला सारखी निरागसता जपली पाहिजे.  स्वार्थ, मत्सर, द्वेष हे काढून टाकले की मन हलकं आणि निरागस होतं. निर्मळ मन समाधान आणि समाधी दोन्ही  साधू शकतं.  रोजच्या जीवनात कामांच्या वेळा त्यामुळे तणाव येणं हे स्वाभाविक आहे पण इथेच स्वतःवर ताबा ठेवून तणाव कमी करायला ह्या समाधीचा उपयोग करून घेता येईल. काही क्षण सगळं विसरून मनाला दुसरीकडे वळवायलाच हवं, थोडी उसंत घेऊन स्वतःला रिफ्रेश करण्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते आणि ताण कमी होतो हे नक्की.                                 ” समाधी साधनं संजीवन नाम..”

          सामान्य माणसानं संजीवन समाधी घेणं अपेक्षित नाही पण काही काळ समाधी लागली तर आपलं आयुष्य चांगल्या अर्थाने नक्की बदलेल हे संतांना माहीत असावं आणि ते आपल्याला कळावं हा त्यांचा उद्देश असणार निश्चित. त्याकरताच संत आपल्या मनाला उपदेश 

करतात, ” मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारणं.”

        

                                        सौ. मंजिरी जानोरकर.