जाणीव -नेणीव

      सरदार सरपोतदार एक मोठे घराणं होते. विश्वासराव सरपोतदार हे वतनदार होते. सावित्रीबाई त्यांच्या पत्नी घराण्याची परंपरा,आब राखून होत्या. बरीच नोकरचाकर हाताखाली कामाला होते. त्यांचा तामझाम त्याच सांभाळत. विजय सरपोतदारांचे म्हणजे थोरल्या चिरंजीवांचे नवीन लग्न झालं होत आणि विशाखा या वाड्यात नुकत्याच राहायला आल्या होत्या. शहरात वाढलेल्या विशाखाला इतक्या नोकर चाकरांची सवय नव्हती, लहानसहान कम सुद्धा त्यांच्या कडून करून घेणं तीला जमतही नव्हत आणि पटतही नव्हते. इकडे आलेल्या विजयचं ती एक वेगळंच रूप अनुभवत होती. शहरात मनमोकळा आणि स्वावलंबी बघितलेला विजय सरपोतदार वाड्यात एखाद्या राजकुमाराप्रमाणे वावरत होता. सावित्रीबाईंनी सखुला कपड्यांच्या घड्या घालून ठेवण्यास सांगितले त्यावेळी मात्र न राहवून विशाखाने जरा बिचकतच पण त्यांना विचारलेच, ” आई इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण नोकर चाकरांची मदत घेणं कितपत योग्य आहे? ही साधी कामं आपणही करूच शकतो ना?”  तिच्या या प्रश्नावर सखुने चमकून वर पाहिले. डोळ्यांच्या खुणेनेच तू जा काम कर असं सांगून विशाखाला जवळ बसवत त्या बोलायला लागल्या, ” विशाखा हे एक छोटे गाव आहे इथे शहराइतक्या सहजपणे रोजगार  मिळत नाहीत आणि देव कृपेने आपल्याला हे चाकर ठेवणं समज शक्य आहे म्हणून त्यांची कुटुंबं चालावित या साठी आपण यांना कामाला ठेवतो.” एवढ्यवरुन पुरेसा उलगडा न झाल्याचे भाव विशाखाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ते पाहून त्या पुढे म्हणाल्या अगं ही सगळी मंडळी इथे शेतावर काम करतात पण ते काम बारा महिने नसतं अगदी त्यांच्या स्वतःच्या शेतात सुद्धा सतत काम नाही करता येत मग मधल्या काळात त्यांना काम आणि पैसा दोन्ही नसतं त्या वेळी ही मंडळी स्वतःहून काम मागायला येतात. त्यांचा स्वाभिमान त्यांना फुकट पैसे घेऊ देत नाही मग आपल्या सारख्यांनीच हे दोन्ही सांभाळून घ्यावं लागत. एरवी गावात हेच गावकरी आपली स्वतःची शेतीची कामे करून आपल्याला मदत करतात, नाहीतर आता शेतमजूर मिळणं कठीण झाले आहे. तर हे सगळं असं आहे त्यांना गरज असते तेव्हा आपण त्यांना काम देतो आणि आपल्या वेळेला ते आपल्या मदतीला येतात. यात त्यांचा स्वाभिमान राखला जातो आणि सोयही.”. 

         शहरातील व्यवहारी जगात वाढलेल्या विशाखाला हे सोपं गणित कळलं त्याही पेक्षा भावलं. एमबीए झालेल्या विशाखाला सासुबाईंचा अभिमान वाटला. 
   सुपरवुमन होण्याच्या नादात आपण सुद्धा सगळं अंगावर ओढवून घेत असतो . लहानसहान कामं म्हणता म्हणता दिवसभर तारेवरची कसरत करत असतो. काही कामासाठी एखादी मदतनीस किंवा घरकामात मदत म्हणून एखादी कामवाली बाई ठेवणं गैर नाही उलट या निमित्ताने आपण एखाद्या स्त्रीला स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी देत असतो. देवकृपेने आपल्याला हे करणं शक्य आहे या करता देवाचे ऋण मानून मिळालेला वेळ सत्कारणी लावू शकतो.  गृहिणी असो अथवा वर्किंग वुमन, स्वतःसाठी जगायला, आनंद मिळवायला हा वेळ वापरता येईल. ” जे जे आपणाला ठावें, ते ते सर्वांना सांगावे ” या उक्तीप्रमाणे जन उद्धार करता येईल अथवा वाचन, मनन, चिंतन, लेखन करता येईल. ही आणि अशी अनेक कामे करता येतील आणि समाज हीतही साधेल.  विशाखा विचारात हरवून गेली होती. या एका छोट्याशा गावात तीला manegement  चा खूप मोठा धडा शिकायला मिळाला होता. 
  
                 
                                                     सौ. मंजिरी जानोरकर