“मनाचिये घावावरी, मनाची फुंकर|” manjireesblog.in च्या ब्लॉग माध्यमातून जरी मी आत्ता सुरवात केली असली तरी सकाळ, ब्राह्मण मानस (मासिक), लोकमत पुरवणी तसेच manjirees.blogspo.com या सगळ्यांतून माझे लिखाण सुरू होते. वाचकांचा प्रतिसाद मिळत होता त्यातुनच ही website सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. पुण्यात शिक्षण घेत असताना काही काळ नोकरी करत मानसशास्त्रात बीए केलं. भरत देसाई, सविता देशपांडे यांच्या सारखे शिक्षक गरवारे महाविद्यालयात लाभले. त्यांनी फक्त शिकवलं नाही तर विविध उपक्रम राबविले समाजातील समस्या जाणून घेऊन त्या मानसशास्त्राच्या दृष्टीने कशा सोडवायच्या, कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था एवढेच नव्हे तर गुन्हेगारी, मानसिक अपंगत्व अशा अनेक गोष्टी या उपक्रमांद्वारे चर्चिल्या गेल्या त्यातून बरेचदा प्रत्यक्ष अनुभव घेता आले. आम्हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या शिबीरांचे आयोजन केलं. त्याच काळात कुठेतरी हे लिखाणाचे बीज अंकुरले असावे. लग्नानंतर मी नाशिकमध्ये गृहिणी म्हणून राहाणे स्विकारले तरीही मुलांना वाढवताना आणि आई म्हणून घडताना शिक्षकांकडून मिळालेले धडे, आईवडलांचे संस्कार आणि येत जाणारे अनुभव यातून माझे लिखाण प्रगल्भ होत गेले आणि अजूनही प्रयत्न चालू आहे. चुका करतच शिकता येते कधीकधी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर येणारी निराशा झटकण्याचे सामर्थ्य आणि नव्याने प्रयत्न करीत राहण्याची गरज हे सगळं मुलांना शिकवताना स्वतःला समजावत असताना मनाचिये घावावरी…. ची संकल्पना सुचली. कधीतरी लेख लिहून तर कधी गोष्टींत गुंफून आपले संस्कार पोहोचवण्यासाठी हा लेखनप्रपंच. नेहमीच्याच घटनांमधून,समस्यांमधून सुचतं आणि विचार करता करता एखादी गोष्ट लिहिली जाते. गृहिणी बनुन घर सांभाळत असताना गृहिणींच्या समस्या जाणवत होत्या, घरातच असल्याने गृहीत धरणं, GDP नसल्याने फारसे महत्व न मिळणं. कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करून सुद्धा स्त्री नेच स्त्रीला उपेक्षित ठेवणं, हिणवणं, टोमणे मारणे वगैरे वगैरे, या सगळ्यात स्त्री स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसते हे लक्षात घेतले जात नाही. तिला आलेली निराशा त्यातून होणारी चिडचिड याचीही चेष्टा होते. नैसर्गिक होणारे शारीरिक, मानसिक बदल तर सुटतच नाहीत पण घरातल्या सदस्यांबरोबरच मुलंही आईचा मान ठेवणं कमी करतात, तुला काही कळत नाही हे म्हणताना तिनेच त्यांना घडवलं आहे हे वास्तव विसरतात. महत्त्वाच्या निर्णयात आई सुद्धा योग्य मार्गदर्शन करू शकते हे मुलंच नाही तर सगळेच जण नाकारतात. या परिस्थितीत आपणच पुढाकार घेत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले पाहिजे ही प्रेरणा प्रत्येक स्त्री मध्ये असते खरंतर फक्त एक मैत्रीण हवी असते साद घालणारी. या website च्या माध्यमातून अशीच एक मैत्रिण बनण्याचा, अगदी स्वतःची सुद्धा, प्रयत्न करत आहे. हे ब्लॉग वाचताना आपण आपलेच विचार वाचतो आहोत किंवा “मलाही असंच काहीसं वाटत होतं”. असं वाचकांना वाटेल असं मला वाटतं. त्यातच माझ्या लेखनाच यश आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही फुंकर पोहोचावी या साठी हा ब्लॉग शेअर करा आणि प्रोत्साहन देत रहा.
सौ.मंजिरी जानोरकर
manjireesblog.in


Very nice