जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी आपल्या हातात नाहीत हे सर्व ज्ञात आहे. मृत्यू कोणाला, कधी, कुठे आणि कसा येईल हे निश्चित असलं तरी माहीत नसतं. अर्थात हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध गायक “K K” चा चटका लावणारा झालेला मृत्यू. या आधीही अनेक लोकप्रिय कलाकार,अभिनेते, अभिनेत्री,गायक असे कोणी ना कोणी हे जग सोडून अचानक आपल्यातून निघून गेले आहेत. अगदी रोजच्या जीवनात सुद्धा आसपासच्या परिसरात ह्या घटना घडतंच असतात पण मग K K, ची चर्चा इतकी का केली ? असं वाटूच शकतं. ताज्या फुलांवर भुंगे सुद्धा मध असेपर्यंत येतात, फुलं कोमेजुन गेली की मात्र नाही. अगदीच स्वाभाविक आहे हे. कालांतराने कोणत्याही गोष्टीचा बहर उतरला की त्या गोष्टी मागे पडतात अथवा विसरल्या जातात. यशाच्या परमोच्च शिखरावर असताना, लोकांमध्ये कार्यक्रम करत असताना, चाहत्यांच्या गराड्यात त्यांच्या हृदयावर आरूढ असलेल्या क्षणी मृत्यू येणं ही घटना सर्व सामान्य निश्चितच नाही. मृत्यू येण्याचं वयही नव्हतं असं आपण म्हणतो पण तो लिहून ठेवलेला असतो हे विसरतो. कला सादर करताना मृत्यू येणं हे कलाकारांच्या दृष्टीने चांगलं किंवा अभिमाचं असावं कदाचित. मी काही कोणी कलाकार नाही पण ज्येष्ठ कलाकार मुलाखती देताना बरेचदा असं म्हणतात ते मी ऐकले आहे, म्हणून वाटलं. हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना मराठी कलाकारांच्या मानाने जास्त लोकप्रियता मिळते त्यामुळे त्यांची चर्चा जास्त होते पण ‘राजा गोसावी’ हे मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार “भ्रमाचा भोपळा” ह्या नाटकाचा प्रयोग चालू असताना अचानक मंचावर गेले. असे काहीसे मी ऐकले आहे. लहानपणापासून मी त्यांची नाटके आणि चित्रपट बघितले आहेत ही बातमी ऐकली तेंव्हा मी लहान होते पण तरीही कोणीतरी जवळचं आपल्यातून गेले असं वाटलं होतं. त्यांचे वय वृद्धत्वाकडे झुकलेले होते पण कलाकारांची वयं प्रेक्षक विचारात घेत नाहीत. त्या वेळी त्यांच्या तश्या जाण्याची बरीच चर्चा सोशल मीडिया फार नसताना सुद्धा झाली होती. म्हणुनच K K च्या जाण्याने मला तो प्रसंग आठवला.
अनेक वृद्ध असाह्य होऊन मृत्यू ची वाट बघत अंथरूणावर पडून असतात आणि वय फारसं नसताना अचानक जाणारे आपण आपल्या समोर बघत असतो त्या वेळी माणूस हा helpless आहे हे जाणवते. जसा जन्म हा प्रत्येक वेळी आनंददायी असतोच असं नाही तसंच मृत्यू ही प्रत्येक वेळी दुःखद असत नाही. मुलं जन्माला आलं आणि आई गेली तर तो जन्म आनंद देऊ शकत नाही तसंच अंथरूणावर खिळलेल्या अती वृद्धाचा मृत्यू, “बरं झालं सुटला बिचारा” हा विचार मनात आणतोच.
तारूण्यात येणारा मृत्यू कुटुंबातील सर्वांत मोठा धक्का असतो. सीमेवर लढणाऱ्या सैनिकासाठी जसा युद्ध भूमीवर येणारा मृत्यू गौरवशाली ठरतो तसंच कलाकारांच्या बाबतीत असावं कदाचित असं मला वाटतं. अर्थात सामान्य लोकांना हे दोन्ही मृत्यू दुःखदायक असतात हे निश्चित. यांच्या मृत्यूमुळे होणारं नुकसान हे सार्वजनिक दृष्टीने खूप मोठं असतं. कर्तृत्ववान सैनिक आणि गुणी कलाकार मंडळी ही देशाचा अभिमान असतात आणि त्यांच्या जाण्यानं प्रत्येकालाच अनाथ झाल्यासारखे वाटते. खरंतर मृत्यू हा लिहीण्याचा विषय कसा असू शकतो? हा प्रश्न मला स्वतःला लिहीण्या आधी पडला होता पण मग तो शाश्वत आहे आणि अंतिम सत्य आहे हे लक्षात आलं. सामान्य व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती लोकप्रिय, तरूण, बालकं, वृद्ध, स्त्रिया, पुरुष,गरीब, श्रीमंत ह्यातल्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम मृत्यू वर होत नाही म्हणूनच शाश्वत आहे आणि तो येणार म्हणजे येणारच टाळणं शक्य नाही म्हणून सत्य.
माणूस नेहमीच सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर स्वार असतो. हे दोन्ही जीवन प्रवाह आहेत. आनंद देणारी गोष्ट शुभं आणि वेदना देणारी अशुभ अशी सोपी व्याख्या जरी आपण केली असली तरी निसर्गाच्या चक्रात दोन्ही गोष्टी समतोल राखण्यासाठी आहेत. आपल्याला साधायचा आहे तो आपला तोल. होणारी गोष्ट टाळता येणार नसली तरी आपण लोकांना हवंहवंसं वाटत असताना मृत्यू यावा आणि अंथरूणावर पडून वाट पाहून सगळेजण कंटाळून गेल्यावर तो येऊ नये यासाठी सुदृढ,निरोगी राहणंं गरजेचे आहे, त्या करता दिनचर्येत अपेक्षित बदल करून घेणं आवश्यक आहे हे नक्की.
सौ.मंजिरी जानोरकर


अगदी खरं आहे आणि विषय पण वेगळा आहे, छान लिहिले आहे
धन्यवाद