कीर्ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात शिकून मोठी झाली होती. पदवी प्राप्त केल्यानंतर रीतीप्रमाणे एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील केवल शी तिचं लग्न झालं. दोन गोजिरवाणी मुलं आणि मोठ्या पदावर कार्यरत असणारा केवल त्यामुळे घरात तशी आर्थिक सुबत्ता होती. कीर्ती सुद्धा गृहकृत्यदक्ष गृहिणी होती. मुळातच मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने काटकसरीने संसार करण्यावर तीचा भर असायचा. माहेरी घर लहान असल्यामुळे वस्तू, कपडे नीटनेटकेपणाने ठेवण्याचं वळण अंगात भिनलेलं होतं. तेच वळण ती मुलांना लावत होती. मुलंही तशी समंजस, व्यवस्थित आणि हुशार होती पण कितीही म्हटलं तरी मुलंच ती, कधीतरी पसारा, भांडणं चालायचीच. आजही नेमकं तेच झालं, ऋताने तिच्या कपाटातले ऋषी चे कपडे बाहेर सोफ्यावर आणून टाकले आणि तिची टकळी सुरू झाली, ” आई तू सांग हं त्याला माझं कपाट आहे ते माझ्या रूममध्ये आणि हा शाहाणा स्वतःची रूम,कपाट सोडून माझ्या कपाटात ठेवतो स्वतःचे कपडे. मी नाही चालवून घेणार हे. माझ्या वस्तू जरा जरी याच्या खोलीत गेल्या की हा फेकून देतो,मग आता कशाला…….” .” अगं हो किती गोंधळ घालतेस, मीच सांगितल त्याला तुझ्या कपाटात कपडे ठेवायला, त्याची पुस्तकं जास्त आहेत आणि अभ्यासही वाढलाय त्याचा जागा नव्हती त्याच्या कपाटात म्हणून सांगितलं, एवढ काय आभाळ कोसळलं लगेच. आमच्या लहानपणी आम्ही…..” आईची ही टेप सुरू होण्याआधी ऋता मान उडवून नाराजी व्यक्त करत निघून गेलीही पण कीर्ती मात्र आठवणीत हरवली.
दोन खोल्यांच्या घरात सगळ्यांसाठी एकच कपाट होतं. प्रत्येकाचा खण मात्र ठरलेला, सगळ्यात वरचा आणि मोठ्ठा खण बाबांचा कारण त्यांचे कामाला जाण्यासाठीचे कपडे हँगर ला लावावे लागत. मग मधले दोन खण आईचे त्यात तिचे कपडे शिवाय जास्तीचे कपडे म्हणजे पलंगपोस, सोलापुरी चादरी वैगेरे गाठोड्यात बांधून ठेवत. एकाच कपाटात कपडे मावणं तसं कठीण आणि नीट ठेवणंही म्हणून मग अशी गाठोडी बांधायची पद्धत होती. खणाच्या , काठपदराच्या साड्या त्यांचे ब्लाऊज इस्त्री करून जुन्या साडीत गाठोडं बांधून त्यात असतं. त्यामुळे जास्तीत जास्त कपडे नीट ठेवले जात असत, मुलंही मग आईचं बघून आपलं चांगल्या कपड्यांचे एक, रोजच्या कपड्यांचे एक अशी गाठोडी बांधून ठेवत. पूर्वी गाठोडी ही मध्यमवर्गीय कुटुंबाची परंपराच होती असं म्हणता येईल. एकाच कपाटात त्यामुळे सगळं कुटुंब नीटनेटकं मावत असे. माझं -तुझं हा विचार सुद्धा मनात येत नव्हता. कधीतरी उशीर झाला तर एकमेकाची उघडलेली गाठोडी आई बांधून ठेवायला लावत असे. एकमेकांना समजून घेण्यासाठी वेगळे काही कधी करावच लागले नाही. यातुनच आठवणींची गाठोडी आणि संस्कारांची जडणघडण झाली. एकमेकांच्या गाठोड्यात कधीतरी डोकावताना आपल्याला सापडत नसलेले काही कपडे दिसत मग लटकी भांडणं होत असत आणि आई म्हणायची,” काय गं बिघडलं एकमेकांचे कपडे वापरले तर, भावंडे आहात ना आज घालून घ्या उद्या लांब गेल्यावर याच आठवणी राहतील तुमच्या जवळ हे सांगताना आईचा स्वर कातर का होत असे ते कीर्तीला आज जाणवलं आणि तिनं हळूच आपले डोळे टिपले आणि ऋताने फेकलेला कपड्यांचा ढीग उचलत मुलांना हे आठवणींच गाठोडं बांधायला कसं शिकवावं हा विचार करत कामाला लागली.
सौ. मंजिरी जानोरकर .


खुपचं छान
धन्यवाद