आई कुठे काय करते??

       सध्या विशेष गाजत असलेली मालिका, “आई कुठे काय करते?” च्या निमित्ताने.  

   मालिकेच्या नावामुळे मी प्रभावित झाले आणि काही भाग पाहीले सुरुवात जरा ठीक वाटली पण त्यातही पती व सासू जरा खटकतच होती. मुळातच मला कौटुंबिक कलह, राजकारण हे सगळं बघायला आवडत नाही पण हेच सगळं बायकांना आवडते असा “सो कॉल्ड” समज असणारी आणि ते खरंच आवडणारी मंडळी सुद्धा समाजात आहेत, हे नाईलाजाने मान्य करावे लागते. याचं कारण ती मालिका अजूनही चालू आहे. 

   मुळांत कोणतीही आई गृहिणी राहून सुद्धा खूप काही करत असते किंवा करू शकते हे सिद्ध करण्यासाठी पती हा बाहेरख्याली दाखवणं, त्याचं लफडं वैगरे असणं गरजेचं वाटणं हेच मला किंवा कोणत्याही स्त्री ला पटण्यासारखे नाही. स्त्री काय फक्त संकटातच खंबीर अथवा कर्तृत्ववान बनू शकते? रोजच्या जीवनात स्वःताच्या करियरचा विचार केवळ घरा करता बाजूला ठेवला म्हणून, “आई कुठे काय करते” हा प्रश्न पडावा?? मुलांना मोठं करून त्यांच्या पायावर उभे करून जरा उसंत मिळालेल्या माऊलीला रिटायर्ड होण्याचा अधिकार नसावा? तिचं घरांत रिकामं बसणं का खटकतं? बरं तर ती तशीही सतत व्यग्र असते कामातच असते पण त्या कामांचं valuation का केलं जातं?                                  खरंतर मला ह्या प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा होती. आज खरंच हे सगळं लिहीण्याची गरज वाटली कारण कोणतीही मालिका ही एक नवीन नाव घेऊन येते  पण दुर्दैवाने ते सार्थ करत नाही. याला अपवाद आहेतच. उगाचच लोक पाहतात म्हणजे काहीतरी मसाला भरून दाखवत राहायचं हे थांबायला हवे. सहज सुंदर अभिनय, संवाद आणि निखळ मनोरंजन हवे आहे. अतिरंजित मेकअप, कलह, श्रीमंती थाट आणि अती सहनशील नायक किंवा नायिका, दुष्टातीदूष्ट खलनायक. या सगळ्याचे स्तोम माजवले आहे. नाजूक हळुवार संवाद, मृदू मुलायम हास्यविनोद हे हरवलंय.  जाणत्या चांगल्या कलाकारांनी खरंच याचा विचार करायला हवा. कारण प्रेक्षक मनापासून खऱ्या करमणुकीची वाट पाहत आहेत. 

                                 सौ. मंजिरी जानोरकर