सदाचार आणि शिष्टाचार

          ” सदचार हा थोर सांडूं नये तो|

             जनीं तोचि तो मानवी धन्य होतो||”

       माणूस सध्या सदाचारापेक्षा प्रोटोकॉल मध्ये जास्त अडकलाय. शिष्टाचार पाळले पाहिजेतच पण त्यात आपलेपणा हरवत नाही हेही बघितले जायला हवे. Sorry, Thanks म्हणणं महत्वाचे आहेच पण हक्काने आपल्या माणसांकडून काही करून घेतले तर व्यक्त केल्या जाणाऱ्या कृतज्ञतेत शब्दांपेक्षा डोळ्यांतील भाव मनापासून स्विकारले जातील.  एखादी चूक झाली तर माफी मागणं जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षाही ती चूक सुधारून आपल्या माणसाला मनवणं सुद्धा छान आहे. ऑफीसमध्ये किंवा घराबाहेर हे शिष्टाचार निश्चितच पाळले पाहिजेत आणि मुलांना सुद्धा शिकवायला हवेतच पण ते शिकवताना नात्यांमधील मस्ती, गंमती, एकमेकांवरील हक्क, प्रेम हे सुद्धा समजून सांगितले पाहिजे. पूर्वी एकत्र कुटुंबात गोष्टी वेगळ्या होत्या सद्आचरण, सद् विचार ह्यांचे संस्कार आपोआप होत होते. आता सणासुदीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि आजची पिढी एकत्रितपणे deal करताना अवघडल्यासारखी होते. आई वडीलांच्या शिवाय इतर कोणाचेही ऐकुन घेण्याची त्यांना मुळी सवयच नसते. मग घरातली इतर मोठी माणसे जर काही बोललीच तर ते उलटं बोलतात किंवा दुर्लक्ष करतात. अशा प्रसंगी नम्रता म्हणजेच politeness अपेक्षित आहे. काका, मामा ह्यांनी केलेली चेष्टा मस्करी त्यांना सहन होत नाही मग, “इकडे कोणालाच मॅनर्स नाहीत. आम्ही काही बोलू आणि तुम्ही आम्हालाच रागवाल. त्या पेक्षा आम्ही येतंच नाही.” असे होते. आई बाबा सुद्धा कटकट नको म्हणून ओके करतात. ह्या सगळ्यात नातं पुढे जात नाही म्हणून कायमच भेटत राहीले पाहिजे आणि शिष्टाचारांपेक्षा आपलेपणा शिकवला पाहिजे. 

        सणवार आणि धार्मिक कार्यक्रमात सुद्धा हेच होते माणूस कर्मकांडात अडकतो आणि आनंद घ्यायला वेळच मिळत नाही. पुजा पाठ गरजेचाच आहे पण श्रद्धेने आणि मनापासून केलेली छोटी पुजा सुद्धा देवाला चालते. दिवसभर उपवास करून प्रत्येक देवतेच्या मुर्ती पुजा वेगवेगळ्या करायला हव्यात असे नाही. याउलट एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून म्हणलेली  एक प्रार्थना, एकत्रितपणे हसत खेळत केलेलं भोजन देवाला जास्त भावेल. त्यातून कळत-नकळत मुलांवरही होणारे संस्कार जास्त अनमोल असतील. नात्यांची गुंफण, सामंजस्य, सुखदुःख वाटून घेण्याची कुटुंबातील पद्धत मुलांना आपोआपच समजेल. समाजात वावरताना ह्या सगळ्याचा उपयोग होईल. सहनशीलता, वाटून घेण्याची वृत्ती, लहान-मोठ्यांना सांभाळून घेण्याची सवय लागेल. 

    एकत्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंबपद्धती ह्या वादात अडकण्यापेक्ष संधी मिळेल तेव्हा एकत्र येऊन ह्यावर तोडगा काढला पाहिजे.  मुलांच्या आणि पालकांच्या बऱ्याच समस्या सोडविण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. पालकांनी आणि घरातील सर्व सदस्यांनी ह्यावर निश्चित विचार करायला हवा. कुटुंब हा समाजाचा आरसा आहे त्यामुळे पडणारे प्रतिबिंब हे जनमानसात उमटणार असते ह्याची जाणीव सगळ्यांना असायलाच हवी.

       

पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.

                                      सौ.मंजिरी जानोरकर.