अनुभूति

            ” भेटि लागी जीवा लागलिसे आस,

                पाहे रात्रं दिवस वाट तुझी…”

   संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा हा अभंग, देव प्रत्यक्ष भेटला आणि आता तो वारंवार भेटत राहावा अशी ओढ ह्या अभंगात जाणवते. पण सामान्य माणसाला हा देव इतक्या सहज भेटत असेल?? आणि समजा तो भेटला तर तो झेपेल?? संतांची योग्यता फार मोठी आहे. म्हणून तो त्यांनाच भेटतो. 

     सर्व सामान्य सश्रद्ध माणूस जेंव्हा मनापासून देवाचा धावा करतो त्यावेळी तो परमेश्वर कोणाच्या तरी रुपात येऊन मदत नक्की करतो. हा अनुभव प्रत्येकानेच घेतला असेल.   श्री प्रमोद केणी यांचे  दिव्यत्वाची जेथे प्रचिती, श्री जगन्नाथ कुंटे  यांचे नर्मदा परिक्रमा. अशा अनेक पुस्तकांतून महंतांनी आपले अनुभव सांगितले आहेत. ह्या सगळ्यांची योग्यता मोठी आहे. आपल्यासारख्यांनी मात्र आपले अनुभव जतन करावेत त्यांची चिकीत्सा करून त्यातली श्रद्धा संपवू नये.  कारण प्रत्यक्ष परमेश्वर कधी धावून आला तरी आपण त्याला ओळखू शकणार नाही.  गूरू कृपेमुळे असेल किंवा काही चांगले कर्म केले म्हणूनच आपली वेळ देवाने राखली असे मानावे.

    माणसाने माणुसकी जपून एकमेकांना मदत केली पाहीजे. गरजवंतासाठी मदत करणारी व्यक्ती नेहेमिच देवतुल्य असते . माणूस त्यावेळी फक्त माणूस नसतो तर देवदूत असतो तोही त्यानेच पाठवलेला. कारण अनेकदा स्वत:च्याही नकळत आपण एखाद्याला मदत केलेली आणि घेतलेली सुद्धा असते. 

     अनपेक्षित मिळणारी एखादि अत्यंत आवश्यक गोष्ट योग्य वेळी आपल्या पर्यंत कशी काय पोहोचते हे एक कोडे आहे. खरेतंर ते न उलगडलेलेच बरे, कारण अति चिकीत्सेमुळे श्रद्धा आणि पुन:प्रचितीच्या अनुभवाला आपण मुकू. आपली अवस्था मग त्या परिस शोधत असलेल्या माणसा सारखी होईल,हातातले लोखंडाचे सोने कधी झाले हे कळणारच नाही. म्हणून जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी आणि ही कृपा अशीच राहावी अशी आस असु द्यावी.

 

  पोस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा 🙏🏻

                      सौ. मंजिरी जानोरकर.